कोल्ह्याच्या हल्ल्यात हुंदळेवाडीतील शेतकरी जखमी,दोन महिन्यात तिसरा हल्ला - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2020

कोल्ह्याच्या हल्ल्यात हुंदळेवाडीतील शेतकरी जखमी,दोन महिन्यात तिसरा हल्ला

हुंदळेवाडी : सट्टूबाई येथील शिवारात कोल्ह्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शेतकरी दत्तात्रय देसाई. हाताला झालेली जखम.  
कागणी / सी एल वृत्तसेवा
    चंदगड तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचे अतिक्रमण सुरू आहे. यामुळे चंदगड तालुक्यात सातत्याने वन्य प्राणी व शेतकरी यांच्यात जीवघेणा संघर्ष सुरुच आहे. हत्ती, गवे, अस्वल, वाघ, कोल्हा यासह अन्य वन्यप्राण्यांचे हल्ले सुरूच आहेत. अशीच घटना रविवारी हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथे घडली. कोल्ह्याच्या हल्ल्यात येथील दत्तात्रय रामचंद्र देसाई हा शेतकरी जखमी झाला.

      गत दोन महिन्यात हुंदळेवाडी येथील हा तिसरा हल्ला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. एकट्याने शेताकडे जाण्यासाठी शेतकरी वर्ग धजावत आहेत. दोन महिन्यांपूर्वी रघुनाथ चिंतू देसाई हा शेतकरी देखील सट्टूबाई नावाच्या शिवारात कोल्ह्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. आठ दिवसांपूर्वी सायंकाळी या गावात मुख्य गल्लीत प्रवेश करून कोल्ह्याने लक्ष्मण गणपती देसाई या शेतकऱ्यावर हल्ला केला होता. तर दतात्रय देसाई हे शेतकरी रविवारी सकाळी  याच शिवारात गवत कापत असताना त्यांच्यावर अचानक कोल्ह्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांच्या डाव्या हातावर कोल्ह्याने चावा घेतला. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर कोल्हा पळून गेला. अशा परिस्थितीत ते कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. प्रथमोपचार झाल्यावर त्यांच्यावर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. 
     वन विभागाने अशा वारंवार होणाऱ्या प्रकाराची तातडीने दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून होत आहे. सदर गावाला लागुनच महिपाळगड हे वनक्षेत्र आहे. या ठिकाणाहून आलेल्या कोल्ह्याकडून सध्याचे हल्ले होत असल्याचे शेतकऱ्यानी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment