सापांची माहिती देणारी मालिका, भाग : ६ नागराज King Cobra (Ophiophagus Hannah) - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2020

सापांची माहिती देणारी मालिका, भाग : ६ नागराज King Cobra (Ophiophagus Hannah)

संग्रहित छायाचित्र : नागराज (किंग कोब्रा)
                  नागराज King Cobra (Ophiophagus Hannah)
       नागराज (किंग कोब्रा) हा भारतातील घनदाट जंगलात आढळणारा दुर्मिळ साप आहे. भारतात हिमालयाचा परिसर, आसाम, केरळ, महाराष्ट्र व कर्नाटकातील जंगलातील दऱ्यांत याचा रहिवास अधिक आहे. तो मनुष्यवस्तीपासून दूर राहणे पसंत करतो. जगातील चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, दक्षिण आफ्रिका खंडासह अनेक देशांमध्ये नागराज आढळतो.  विषारी सापांमध्ये जगात सर्वाधिक लांब व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक आहे. डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. अंडी टाकण्यासाठी हा साप पालापाचोळ्याचे घरटे करतो. त्यात मार्च-एप्रिल दरम्यान मादी १५ ते २५ अंडी घालते व त्यांचे रक्षण करते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले  १ ते २ फूट लांबीची असतात. हा साप विशेषतः इतर सापांना खाऊनच जगतो.  क्वचित प्रसंगी इतर प्राणी खातो. याचा रंग काळसर तपकिरी, हिरवट तपकिरी, गडद हिरवट, राखाडी असतो. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना असे आहे. त्याची लांबी सुमारे ५.६ मीटर (१० ते १५ फुट) असते. नागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहे. एका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो. काही वेळा पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटते. नागाच्या तुलनेत लांबट फण्यामुळे ओळखता येतो. मानेवर ^ (इंग्रजी उलटा व्ही ) आकाराचे चिन्ह असते. डोके वजनदार असते. जबड्याच्या विशिष्ट रचनेमुळे तो मोठे भक्षही गिळू शकतो.  नागाप्रमाणे वरच्या जबड्यात दोन पोकळ विषदंत असतात. नर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतो. याचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीची कंपने चांगली कळतात या वरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. हालचाल करणाऱ्या सहा फुटावरील बेसावध प्राण्यावर क्षणात झेप घेतो.
           नागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे. सापांचा शत्रू मुंगूस चा तो यशस्वी प्रतिकार करतो. एका वेळी तो अनेक चावे घेतो. प्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात खुपसल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते. नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते. 
 तीव्र, वेदना, चक्कर येणे, पक्षाघात, शक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. हार्टफेल, कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा ते चाळीस मिनिटात मरण पावते.  तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊन सुद्धा नागराजाने दंश केलेल्या ७५ टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो.
        *विशेष म्हणजे* ढोलगरवाडी सर्पोद्यान चे संस्थापक सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी सन १९७९ साली हेमडगा, (ता. खानापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) च्या जंगलात बारा फूट लांबीचा नागराज साप पकडून  ढोलगरवाडी सर्पोद्यान मध्ये ठेवले होते.(नागराज पकडणे कामी त्यांना बंधू तानाजी श. वाघमारे व शिवाजीराव सटुप्प पाटील, तेऊरवाडी यांचे सहकार्य लाभले होते.) तेव्हाच्या नागपंचमीला नागराज - किंग कोब्रा (नागिन) पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील अनेक सर्पप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. त्याकाळी या घटनेची मोठी चर्चा झाली होती.

संकलन व लेखन :- श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड जि. कोल्हापूर) मोबाईल नंबर - 9423270222

सहकार्य :- सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील (सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी), तानाजी वाघमारे (उपाध्यक्ष- शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी), भरत दत्तात्रय पाटील (सेवानिवृत्त डीएफओ- कोल्हापूर)




No comments:

Post a Comment