वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २३ (बिनविषारी साप) अजगर - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २३ (बिनविषारी साप) अजगर

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २३ (बिनविषारी साप) अजगर
               अजगर / Indian Rock Python (python molerus )
अजगर हा भारतात वावरणारा विशालकाय राक्षशी पण  बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. महाराष्ट्रातील सह्याद्री पश्चिम घाटातील ठाणे, रायगड पासून आंबोली ते किल्ले पारगड परिसरात अजगरांचा आढळ अधिक आहे. पूर्ण वाढ झालेल्या या अजगरांची लांबी सरासरी तीन मीटर ते सात मीटर इतकी आहे. अनेक वेळा चारायला नेलेल्या गाय व म्हशींची वासरे, रेडके या सापांच्या भक्ष्यस्थानी पडतात. 
 (मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.) पायथॉन रेटिक्युलेटस जातीचा सर्वात मोठा अजगर १० मीटर लांब व ३० सेंमी घेरी चा आढळला आहे. 
 अजगराच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर करड्या,मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे विशिष्ट आकाराचे मोठे पट्टे किंवा वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. अजगराचे वरचे ओठ उष्णतेबाबत संवेदनशील असतात. याद्वारे अजगराला रात्री अंधार व थंडीत उष्ण रक्ताच्या भक्ष्याची चाहूल लागते.
हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना तो कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर  त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे मोठे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगर सहा महिन्यांपर्यंत काही न खाता खाता राहू शकतो.
जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मीलनकाळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. शरीराचे आकुंचन-प्रसरण करून ती अंडी ऊबवते.
मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नाही. पण सर्वात प्रमुख शत्रू म्हणजे माणूसच आहे. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. बऱ्याच वेळा भीतीपोटीही  अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असल्याने अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची मोठी तस्करी होते. फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे तसेच तो विषारी घोणस सापासारखा दिसत असल्यामुळेही  त्याला मारले जाते. या कारणांमुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment