कलिवडे शाळेतील शिक्षक आदर्श पुरस्कारापासून वंचित राहणार का? एका जि. प. सदस्याचा राजकीय दबाव, शाळा व्यवस्थापन समिती आंदोलनाच्या पावित्र्यात, पत्रकार परिषदेत माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

कलिवडे शाळेतील शिक्षक आदर्श पुरस्कारापासून वंचित राहणार का? एका जि. प. सदस्याचा राजकीय दबाव, शाळा व्यवस्थापन समिती आंदोलनाच्या पावित्र्यात, पत्रकार परिषदेत माहिती

चंदगड / प्रतिनिधी

          कलिवडे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सतिश माने यांना जि.प.मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवण्यासाठी  तालुक्यातील एका जि प सदस्याने आपल्या पदाचा गैरवापर करून डोंगराळ भागातील शाळेवर अन्याय करत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने पत्रकार परिषदेत केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक कदम, उपाध्यक्ष विजय गावडे, शिवाजी गावडे, अशोक पाटील, कृष्णा गूरव,निवृत्ती गावडे,लक्ष्मण पाटील यावेळी उपस्थित होते.

       २०२१-२२ या वर्षातील जि प आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चंदगड तालुक्यातून  सतीश मारुती माने (कलिवडे)यांनी प्रस्ताव सादर  केला. मूल्यमापनात त्यांना ९३ गुण प्राप्त झाले. या मूल्यमापन समितीचे अध्यक्ष तालुक्याचे सभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी संपूर्ण गुणांची पडताळणी करुन मूल्यमापन केले आहे. शिक्षक श्री. माने  सर्व मुद्यांचे व्यवस्थीतरीत्या पुरावे सादर केले आहेत. स्वत:च्या गावातील रहीवाशी असणाऱ्या शिक्षिकेला पुरस्कार मिळावा म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करुन  जि. प. सदस्य यांनी स्वत:चे पत्र दि. २४/०८/२०२१ रोजी देऊन जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव आणुन आपल्याच तालुक्यातील एक नामवंत वकील असणाऱ्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली मूल्यमापन केलेल्या तालुकास्तरीय मूल्यमापन समितीवर स्वत:च्या स्वार्थासाठी अविश्वास व्यक्त केला आहे. सदर प्रस्तावांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी दि. १२/१२/२००० च्या शासनाच्या परीपत्रकाची पायमल्ली करून स्वत:चे राजकीय वजन वापरुन लोकप्रतिनिधींना वगळून, नियमबाह्य मूल्यमापन समिती तयार करुन फेर मुल्यांकनाचा दुराग्रह धरला आहे. संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद कोल्हापूर येथे उपस्थितीत राहण्यासाठी भाग पाडले आहे. कलिवडे शाळा गेली तीन-चार वर्षे तालुक्यात अग्रस्थानी आहे. जिल्हा परिषदेने राबविलेल्या प्रज्ञाशोध परीक्षा उपक्रमात विद्यार्थी पात्र ठरविले आहेत. शिष्यवृत्तीतही विद्यार्थी राज्य गुणवत्तेत झळकले आहेत. मिपा अंतर्गत निवड झाली असून त्याचे सादरीकरण सतीश माने  डाएट कोल्हापूर येथे स्वतः केले आहे. आमची शाळा तालुक्यातील पहिली आय. एस. ओ. मानांकन प्राप्त शाळा आहे. एवढे असतानासुध्दा तालुकास्तरीय समितीच्या मूल्यमापनावर पूर्णतः अविश्वास व्यक्त करून या जिल्हा परिषद सदस्यांनी फेर मूल्यांकन का मागितले आहे? याचा खुलासा आम्हा ग्रामस्थांना व्हावा. डोंगरकपारीतील मागास विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या कोणताही राजकिय आश्रय नसलेल्या या मागासवर्गीय कामसू शिक्षकाला न्याय मिळावा. 

         वास्तविक शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय मूल्यमापन समिती काम करते. यामध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी महिला व बालकल्याण सभापती, समाजकल्याण सभापती, शिक्षण समिती सभापती, डाएटचे प्राचार्य व माध्यमिक शिक्षणाधिकारी एवढ्या सदस्यांकरवी मूल्यांकन केले जात असताना मध्येच अचानक जिल्हा प्रशासनावर राजकिय दबाव आणून फेर मूल्यांकनाची मागणी का? व कशासाठी? केली आहे. याची उकल व्हावी अन्यथा एका मागासवर्गीय शिक्षकावर होणाऱ्या अन्याया विरोधात  जिल्हापरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही या शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.

------------------------------------------------No comments:

Post a Comment