'चंदगड नगरपंचायत निवडणुक' नगराध्यक्ष पदासाठी ७ व १७ नगरसेवकांसाठी ६४ जणांचे अर्ज, उद्या सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, नेते व इच्छुकांची धावपळ - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2025

'चंदगड नगरपंचायत निवडणुक' नगराध्यक्ष पदासाठी ७ व १७ नगरसेवकांसाठी ६४ जणांचे अर्ज, उद्या सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, नेते व इच्छुकांची धावपळ

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी ७ जणांसह नगरसेवक पदासाठी ६४ अशा ७१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती तहसीलदार कार्यालय चंदगड निवडणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.

   सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांसह उमेदवारांच्या हालचाली वाढल्या आहेत. कागदपत्रांच्या जमवाजमवीसाठी मोठी धावपळ उडाली आहे. 

  दोन्ही आघाड्यांकडील संभाव्य व इच्छुक उमेदवारांनी गेली पाच वर्षे सामाजिक कार्याची पेरणी करून चांगली मशागत केली आहे. तथापि गेली चार-पाच वर्षे मेहनतीने बांधलेले बुरुज ढासळू नये, नेतेमंडळींकडून आपले तिकीट कापले जाऊ नये, यासाठी कडेकोट पहारे तैनात केल्याचे चित्र चंदगडात दिसत आहे.

   निवडणूक चंदगडात असली तरी या निवडणुकीकडे संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात काही मोजक्या नगरपंचायत निवडणुकीत शरद पवार व अजित पवार असे दोन्ही राष्ट्रवादी गट, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षांना घेऊन भाजप विरोधात उभे ठाकले आहेत. त्यात चंदगड नगरपंचायत निवडणुकीचा समावेश असल्याने राज्यभरातील राजकीय विश्लेषक येथील लढतींकडे लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment