पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा...! पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, चंदगड तालुका पत्रकार संघाला 'राष्ट्रीय लोकप्रतिमा पुरस्कार' प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2022

पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा...! पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, चंदगड तालुका पत्रकार संघाला 'राष्ट्रीय लोकप्रतिमा पुरस्कार' प्रदान


बेळगाव येथे पुरस्कार स्विकारताना चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजाचा आरसा असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका पत्रकार संघाचे सामाजिक भावनेतून सुरू असलेले कार्य राज्यातील सर्व पत्रकारांना अनुकरणीय असे आहे. असे गौरवोद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले. ते श्यामरंजन प्रतिष्ठान मुंबईच्या बेळगाव येथील 'राष्ट्रीय संस्कृती संमेलन बेळगाव २०२२' च्या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

          यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाला राष्ट्रीय स्तरावरील 'राष्ट्रीय लोक प्रतिमा पुरस्कार' डॉक्टर कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लोकमान्य रंगमंदिर, रिझ टॉकीज बेळगाव येथे १६ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी डॉ स्मिता कोल्हे, थाबाजी शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

          २० मे १९९४ रोजी चंदगड तालुका पत्रकार संघाची स्थापना (रजिस्टर) झाली होती. गेल्या अठ्ठावीस वर्षात पत्रकार संघाने विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल च्या माध्यमातून बातम्या देऊन सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या व मागण्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणणे, अन्यायाला वाचा फोडणे, चांगल्या व आदर्श गोष्टींना प्रसिद्धी देणे, यासह तालुक्यातील दुष्काळ, अतिवृष्टी, पूरस्थिती, वादळ, कोरोना संकट आदी प्रसंगीचे वास्तववादी लेखन व चित्रण केले आहे. 

           पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोना काळात परप्रांतीयांना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्यासाठी केलेले कार्य, संकट समयी गरजूंना रोख रक्कम, धान्य, कपडे आदी जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, विविध प्रसंगी रुग्णांना फळे वाटप, गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन व मार्गदर्शन, मुख्यमंत्री, पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी केलेली मदत, चंदगड तालुक्यातील जनतेसाठी 'आपल्या हक्काचे व्यासपीठ' म्हणून गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू केलेले 'चंदगड लाईव्ह पोर्टल चॅनल', या माध्यमातून सुरू असलेले समाजकार्य, अशा अनेक सेवाभावी उपक्रमांची दखल पुरस्काराच्या निमित्ताने श्यामरंजन फाउंडेशनने घेत पुरस्कार प्रदान केला. यापूर्वीही सन २०२० मध्ये पत्रकारांची मातृसंस्था 'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे'च्या वतीने दिला जाणारा मानाचा 'राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ' पुरस्कार अक्कलकोट येथील भव्य कार्यक्रमात प्रदान करून चंदगड तालुका पत्रकार संघाचे कार्य अधोरेखित केले होते. 

           पुरस्कार स्वीकारताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, खजिनदार तथा सी. एल. न्यूजचे संपादक संपत पाटील, संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे, सदस्य संजय के. पाटील, तातोबा गावडे, संजय मष्णू पाटील, महेश बसापुरे, प्रकाश ऐनापुरे, सागर चौगुले, संतोष सुतार, उदयकुमार देशपांडे, विशाल पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment