हजारो भाविकांची उपस्थितीत रवळनाथ यात्रेला प्रारंभ, रविवारी स्थानिकांच्या यात्रेसह उत्सवाची होणार सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

हजारो भाविकांची उपस्थितीत रवळनाथ यात्रेला प्रारंभ, रविवारी स्थानिकांच्या यात्रेसह उत्सवाची होणार सांगता

 

चंदगड येथील रवळनाथ यात्रेतील पालखी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          येथील ग्रामदैवत व ८४ खेड्यांचे श्रध्दास्थान श्री रवळनाथ देवाच्या यात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली. सासनकाठी, आरती व पालखी मिरवणुकीसह हजारो भाविकांच्या गर्दीत यात्रा उत्सवाला आज प्रारंभ झाला. रविवारी ता. ३ मार्च रोजी यात्रेची सांगता होणार आहे. चंदगड तालुक्यातील भाविकांसह  आजरा, गडहिंग्लज, बेळगाव व गोवा येथील हजारो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावत दर्शनासाठी मोठी रांग लावली होती.

मंदिराचे पुजारी गुरव यांनी घेतलेली डोक्यावरील आरती

      सकाळपासूनच रवळनाथ मंदिराच्या परीसरात दुकानदारांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बाहेरगावाहून फिरते पाळणे, घसरगुंडी, मशीनवरील घोडे फिरणे आदी मनोरंजनाचे कार्यक्रम दिवसभर सुरु होते. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, हंबेरे, मांगलेवाडी, देसाईवाडी येथील गावची आज यात्रा असल्याने या गावातील लोक दिवसभर येथे थांबून होते. आपल्या संपूर्ण परिवारासह बाहेरगावाहून आलेले चाकरमानीही उपस्थित होते. यात्रेमध्ये महिलांची गर्दी दिसत होती. 

सासनकाठी

       पालखी मिरवणूक मार्गात अडथळा येवू नये म्हणून स्वयंसेवक भक्तांनी मानवीकडे करुन भाविकांना सुचना देत होते. दुपारी साडेतीन वाजता युवकांनी सासनकाठीची मिरवणूक काढली. त्यानंतर पालखीच्या पाच प्रदक्षिणा मंदिराभोवती घालण्यात आल्या.भाविक पालखी व सासनकाठीवर गुळ, खोबरे, बत्ताशे, चिरमुरे, लाडू यांची उधळण करत होते. 

यात्रेनिमित्त चंदगड येथे आलेले झुलते पाळणे.

       पुजारी विलास गुरव यानी डोकवरील आरतीसह मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केला. जिल्हा सत्र न्यायाधीश कविता आगरवाल, कोर्ट मॅनेजर श्रीमती खाडे, चंदगडचे  न्यायाधीश सी. यु. शिपकुले, न्यायाधीश वामन जाधव, न्यायाधीश ए. सी. बिराजदार, तहसिलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन सावंत, ट्रस्टचे सचिव सुरेश सातवणेकर, इन्द्रजित सावंत-भोसले, पुजारी गोविंद गुरव, अभय देसाई, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, सचिन बल्लाळ, चंदगड अर्बन चेअरमन दयानंद काणेकर, नगराध्यक्षा प्राची काणेकर, भास्कर कामत, बाबुराव हळदणकर, अरूण पिळणकर यासह स्थानिक नागरिक मिरवणूकीत सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीनंतर नारळ फोडण्यात आले. गुरुवारी चाळोबा यात्रा, शुक्रवारी सातेरी व भावेश्वरी यात्रा व शनिवारी इटलाई यात्रा होते. रविवारी (ता.३मार्च रोजी) यात्रेची सांगता होते.

No comments:

Post a Comment