सोनार हत्याकांडातील आरोपी रमेश पाटील याला फाशी द्या...!, बाळकृष्ण सोनार यांच्यावर कालकुंद्रीत अंत्यसंस्कारावेळी मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

सोनार हत्याकांडातील आरोपी रमेश पाटील याला फाशी द्या...!, बाळकृष्ण सोनार यांच्यावर कालकुंद्रीत अंत्यसंस्कारावेळी मागणी

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यातील तुडये ते कोदाळी मार्गानजीकच्या स्वप्नवेल पॉईंट पर्यटन क्षेत्र परिसरातील जंगलात काल दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी तुडये येथील (मुळ गाव कालकुंद्री, ता. चंदगड) सराफ व्यवसायिक बाळकृष्ण अनंत सोनार  (वय ६८) यांची हत्या झाली होती. त्यांच्यावर आज दि २८ रोजी सकाळी १०.३० वाजता कालकुंद्री  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कालकुंद्री व पंचक्रोशीतील जमलेले संतप्त ग्रामस्थ तसेच सोनार समाजाच्या वतीने निष्पाप बाळकृष्ण सोनार यांची हत्या करणारा नराधम आरोपी रमेश बाबू पाटील (रा. तुडये) याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

     सोने चांदीच्या दागिन्यांची उधारी व उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार करून पळून गेलेला आरोपी रमेश याला चंदगड पोलिसांनी रंगेहाथ पकडून मुसक्या आवळल्या आहेत. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास रमेश याने बाळकृष्ण सोनार यांना तुमचे पैसे देतो चला, असे सांगून कळसगादे, कोदाळी पर्यंत घेऊन गेला.  पैशांची व्यवस्था न झाल्याने शॉर्ट कट रस्त्याने परत तुडये ला जाऊ असे सांगून जंगलात नेले. अनेक वर्षांपासून पासून रमेश याची ओळख असल्याने तो आपला असा घात करेल याची पुसटशीही कल्पना बाळकृष्ण सोनार यांना आली नाही. मात्र पैसे बुडवण्याच्या हेतूने रमेशच्या मनात वेगळाच कट शिजत होता. हल्ल्यानंतर सोनार मेला असे समजून तो पळून गेला. तथापि निपचित पडलेल्या सोनारने शुद्धीवर आल्यानंतर पोलीस व वनअधिकाऱ्यांना आपल्यावर कोणी व कसा हल्ला केला याची स्टोरी मृत्यूपूर्वी सांगितली. गडहिंग्लज येथे शासकीय रुग्णालयात पोहोचत असताना अखेर सोनार याचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लज येथे दवाखान्यात नेत असताना सोनार वाटेत महागाव पर्यंत बोलू शकत होता  असे समजते. दुसरीकडे तातडीने हालचाली करून पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी रमेश पाटील याला तुडये येथील घरी रक्ताने माखलेले कपडे धुताना रंगेहात पकडले.

          कालकुंद्री येथे अंत्यसंस्कार प्रसंगी एम. जे. पाटील, माजी सभापती यशवंत सोनार, सुरेश घाटगे, चंद्रकांत कांबळे आदींसह परिसरातील ग्रामस्थ तसेच सोनार समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी आरोपी रमेश पाटील याला फाशीची शिक्षा होईल. अशा पद्धतीने पोलिसांनी चार्जशीट तयार करावी, तसेच या कटात अजून कोण सामील आहे? याबाबत कसून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

     दरम्यान आज दुपारनंतर चंदगड पोलिसांनी आरोपी रमेश पाटील याला चंदगड न्यायालयात न्यायाधीश श्री. शिपकुले यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी त्याला १ मार्चपर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.


No comments:

Post a Comment