चंदगड / सी एल वृत्तसेवा
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन अबॅकस स्पर्धा २०२६ मध्ये चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
नेसरी येथील अबॅकस सेंटरमधून तीन विद्यार्थी आणि चंदगडमधून एक विद्यार्थी अशा चार विद्यार्थ्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली होती.
या स्पर्धेत श्रेयश प्रशांत नलवडे (रा. हेबाळ-जलदयाळ, इयत्ता पाचवी) या विद्यार्थ्याने ई कॅटेगरीमध्ये अव्वल कामगिरी करत केवळ ५ मिनिटे १७ सेकंदांत १०० गणिते अचूक सोडवून १०० पैकी १०० गुण मिळवले. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते त्याला ट्रॉफी आणि सायकल देऊन गौरविण्यात आले.
याच स्पर्धेत इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. हर्षवर्धन शिवगोंडा पाटील (इयत्ता ३ री, रा. लाकूडवाडी) याने ९४ गुण, स्वनिक राजेश पाटील (इयत्ता २ री, रा. नेसरी) याने ९१ गुण आणि अद्विक दीपक पाटील (इयत्ता २ री, रा. चंदगड) याने ९० गुण मिळवत स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. या तिन्ही विद्यार्थ्यांना “बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे गुरव प्रोअॅक्टिव्ह अबॅकस, चंदगड सेंटरचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सेंटरचे संचालक राम गुरव (सातवणे) यांना “बेस्ट सेंटर अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment