"चंदगड मधील पत्रकारांचा उपक्रम कौतुकास्पद...!" न्यायाधीश वामन जाधव, 'पत्रकार ऑफिसर्स लीग २०२६' क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ, पोलीस व पत्रकार संघातील पहिल्या लढतीमध्ये पत्रकार पराभूत - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2026

"चंदगड मधील पत्रकारांचा उपक्रम कौतुकास्पद...!" न्यायाधीश वामन जाधव, 'पत्रकार ऑफिसर्स लीग २०२६' क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ, पोलीस व पत्रकार संघातील पहिल्या लढतीमध्ये पत्रकार पराभूत

   

पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगडचे न्यायाधीश वामन जाधव, शेजारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व पत्रकार संघाचे सदस्य

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धा या महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. या स्पर्धा यापुढेही निरंतर सुरू राहिल्या पाहिजेत यासाठी न्यायालय व अन्य विभागांचे सहकार्य कायम राहील असे गौरवोद्गार दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगडचे न्यायाधीश वामन जाधव यांनी काढले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने  आयोजित  'पत्रकार ऑफिसर्स लीग २०२६'  क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटक या नात्याने बोलत होते. यावेळी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, आगार व्यवस्थापक सतीश पाटील, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, तहसीलदार राजेश चव्हाण, बांधकाम विभागाचे अभियंता इफ्तेकार मुल्ला, आरोग्य अधिकारी डॉ बी. डी. सोमजाळ, कृषी, वन विभागाने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील (हिंडगाव फाटा) इंडॉल क्रीडांगणावर   स्पर्धेला सुरुवात झाली. पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संतोष सावंत-भोसले, संस्थापक अनिल धुपदाळे, संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांनी स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश जाधव म्हणाले तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात काम करत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खेळाचा आनंद घेण्यास वेळ मिळत नाही. तथापि येथील पत्रकारांनी गेल्या चार वर्षापासून सुरू केलेल्या या स्पर्धेमुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय वाढला असून या स्पर्धेमुळे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण होत आहेत. हा कौतुकास्पद उपक्रम असाच निरंतर सुरू राहावा यासाठी न्यायालय न्यायालयाकडून नेहमीच सहकार्य राहील. असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील म्हणाले चंदगडचे तत्कालीन न्यायमूर्ती ए. सी. बिराजदार, न्यायमूर्ती चारुदत्त शिपकुले व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या संकल्पनेतून चंदगडच्या पत्रकारांनी सुरू केलेली ही स्पर्धा महाराष्ट्रातील अशा प्रकारची एकमेव स्पर्धा असून इथे काम करून गेलेला प्रत्येक कर्मचारी व अधिकारी इथून बदली झाल्यानंतर या स्पर्धेबद्दल तोंड भरून कौतुक करत राहतो. येथील पत्रकारांमुळेच आम्हाला हे आनंदाचे क्षण लाभले आहेत. अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी चंदगड तालुक्यात क्रिकेटसह अन्य खेळांना वाव देण्यासाठी तालुक्याच्या विविध भागात किमान तीन ठिकाणी क्रीडांगणांची आवश्यकता असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या एक-दोन वर्षात या कामी यश मिळेल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदगड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव चेतन शेरेगार, सदस्य संजय के. पाटील, संजय म. पाटील, संतोष सुतार, मारुती पाथरवट, सागर चौगुले, संदीप तारीहाळकर, राजेंद्र शिवणगेकर, उत्तम पाटील, सचिन तांदळे, नंदकुमार ढेरे आदी पत्रकार उपस्थित होते. पत्रकार संघाचे खजिनदार व स्पर्धा विभाग प्रमुख संपत पाटील (संपादक सी एल न्यूज) यांनी आभार मानले.

   या स्पर्धेत मागील वर्षी प्रमाणे यंदाही १६ तुल्यबळ संघ सहभागी झाले असून यात पोलीस,  न्यायालय, वनविभाग, बांधकाम, आरोग्य, कृषी, पंचायत समिती, एसटी महामंडळ, पत्रकार, एचडीएफसी बँक, नगरपंचायत, एलआयसी, बँकिंग असोसिएशन, महावितरण आदी संघांचा सहभाग आहे.

  दरम्यान आज झालेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात चंदगड पोलीस टीमने पत्रकार संघावर नऊ गडी राखून विजय मिळविला. आठ षटकात पत्रकार संघाने सहा गडी बाद ५० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तर दाखल पोलीस संघाने चार षटकात ५१ धावा काढून विजयी सलामी दिली. 

   या स्पर्धा पुढील एक महिनाभर शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार असून उद्या रविवार दि. ७ रोजी रंगपंचमी असल्यामुळे स्पर्धेतील उर्वरित सामने शनिवार दि. १४ मार्चपासून पुढे खेळवण्यात येतील याची सहभागी संघांनी नोंद घ्यावी. असे पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment