विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आवश्यक - प्रा. बी. एम. पाटील, माडखोलकर महाविद्यालयात विज्ञान दिन - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आवश्यक - प्रा. बी. एम. पाटील, माडखोलकर महाविद्यालयात विज्ञान दिन

  

प्रा.बी.एम .पाटील बोलताना. व्यासपीठावर मान्यवर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        "दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांनी  कोणत्याही गोष्टीचा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करावा .कारण विश्वातील प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावानेच घडत असते. निसर्गाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न विज्ञानाच्या निकषावर करून डोळस दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे."असे प्रतिपादन प्रा. बी. एम. पाटील यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील विज्ञान दिन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने हे होते. यावेळी बोलताना प्रा. पाटील पुढे म्हणाले "डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आशिया खंडातील तेपहिले भौतिक शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी नोबेल पारितोषिक प्राप्त केले. त्यांचा रामन परिणामहा शोध आज जगभर मान्य केला जातो. पारदर्शक वस्तू मधून बाहेर पडणारे प्रकाश किरण व त्यांच्या गतीमध्ये घडणारे परिवर्तन हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीपासून प्रेरणा घ्यायला हवी.         

     अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.एम. एम .माने यांनी "विद्यार्थ्यांनी विज्ञानाची मूलभूत तत्त्वे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसेच विज्ञानाच्या शिक्षणाचा दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापर केला पाहिजे. रोजच्या व्यवहारात विज्ञान कशा पद्धतीने अंमलात आणता येईल याचा शोध घेतला पाहिजे." असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. एन. एस. मासाळ यांनी मनोगत व्यक्त के ले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एल. एन. गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक प्रा. एम. एस. दिवटे यांनी केले तर प्रा. पी. ए. निट्टुरकर यांनी सूत्रसंचालन केले. चैत्राली सुतार हिने आभार मानले. कार्यक्रमास विज्ञान शाखेचे विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment