बहुजन समाज शिक्षणापासून वंचित - प्रवीण काकडे - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2024

बहुजन समाज शिक्षणापासून वंचित - प्रवीण काकडे


चंदगड / प्रतिनिधी  
   डोंगरात, द-या-खोऱ्यात वास्तव्यास  असणाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते हे महाराष्ट्रातील पुरोगामी राज्याचं दुर्दैव आहे असे प्रतिपादन प्रवीण काकडे यांनी केले.
 अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांनी देवाचा डोंगर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खेळाडूंना साहित्य वाटप याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ झोरे होते.
 श्री.  काकडे पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना डोंगरदऱ्या खोऱ्यातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शतकानशतके शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला अस्मितेची ओळख देण्याचे आणि समतेवर आधारित नव समाजाचे स्वप्न पाहण्यासाठी नवीन पिढीला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आजही डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थी सोयी उपलब्ध नसल्याने पाच ते सहा किलोमीटरच्या पुढे पायी चालत जाऊन शाळेत शिक्षण घ्यावे लागते. वनप्राण्यांची हल्ले होत आहेत. त्यामुळे शिक्षणापासून गोरगरीब वर्ग वंचित राहत आहेत. म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट शिक्षणाचे महत्त्व गावोगावी जाऊन पटवून देत असून विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी साहित्य वाटप केले जाते. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या सातही  जिल्ह्यातील डोंगरी भागातील जंगलातील विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असून आज शासन विद्यार्थी संख्येचे पटसंख्या कमी असल्याचे सांगून शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. त्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन आम्ही जनजागृती व प्रबोधन करत असल्याचे सांगितले. यावेळी विजय गोरे, समीर आखाडे, पांडुरंग बंडगर, पप्पू आखाडे, रविंद्र ढेबे, विकास कोकळे, पांडुरंग कोकळे, दत्ताराम आखाडे, निलेश आखाडे, शांताराम आखाडे, मंगेश आखाडे, राजेंद्र कोकळे, संतोष लुगारे यासह विद्यार्थी, ग्रामस्थ व खेळाडू उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment