आजरा : गोपाळ गडकरी / सी. एल. वृत्तसेवा
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसान, सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांवर होणारे हल्ले या प्रश्नी दि. ३० मे २०२५ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय विरोधात तहसीलदार कार्यालय आजरा येथे मोर्चा व धरणे आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजरा येथील वन विभागाच्या कार्यालयात आज दि. २६ रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि आंदोलकांनी आपण आंदोलनावर ठाम असून विभागीय उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद आंदोलन स्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही! असा निर्वाणीचा इशारा दिला.
यावेळी झालेला चर्चेत वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करणे या मुख्य मागणीसह इतर विविध अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान, हल्ल्यात जखमी किंवा मृत झालेले शेतकरी व नागरिक इत्यादी घटनांबाबत वनविभाग नुकसान भरपाई देणे किंवा काहीच उपाययोजना करताना दिसत नसल्याचा आरोप यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मागील महिन्यात गव्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना अद्याप नुकसान भरपाई का मिळालेली नाही? वनविभागाला दिलेल्या निवेदनानुसार आतापर्यंत काय कारवाई केली? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. वन्य प्राण्यांकडून होत असलेले नुकसान व हल्ले याबाबत चालढकल करणाऱ्या वन विभागात विरोधात तहसील कार्यालय आजरा येथे एकदिवशीय धरणे व मोर्चा निश्चित असून यावेळी उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी स्वतः येऊन उपाययोजनांबाबत हमी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे ठासून सांगितले.
हा प्रश्न एका आजरा तालुक्यापुरता किंवा बहुजन मुक्ती मोर्चा पार्टी पुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहेत. याचा विचार करून वनविभागाच्या विभाग व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आंदोलनात शेतकरी व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे! असे आवाहन केले. यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, अमित सुळेकर, दत्तराज पाटील, रोहिदास दारुडकर, इर्शाद भडगावकर, सुरेश दिवेकर, झुल्फिकार शेख, सूर्यकांत कांबळे, अंकित कांबळे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment