कागणी ते कालकुंद्री नवीन रस्त्यावर पाणी, नवीन मारलेले पांढरे पट्टे निकृष्ट दर्जाचे - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2025

कागणी ते कालकुंद्री नवीन रस्त्यावर पाणी, नवीन मारलेले पांढरे पट्टे निकृष्ट दर्जाचे

 


चंदगड :  सी एल वृत्तसेवा

      मागील महिन्यात म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये तयार करण्यात आलेल्या कागणी ते कालकुंद्री या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठत असून रस्ता टिकवायचा असेल तर हे पाणी तात्काळ बाजूला काढावे.  अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांतून होत आहे. याबरोबरच पंधरा दिवसांपूर्वी नवीन रस्त्यावर मारण्यात आलेले पांढरे पट्टे निकृष्ट दर्जामुळे उखडण्यास सुरुवात झाली आहे.

        गडहिंग्लज, नेसरी, कोवाड ते बेळगाव या मुख्य मार्गाला हत्तरगी येथे थेट पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडणारा जोडणारा कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी खुर्द ते दड्डी हा महाराष्ट्र हद्दीतील सुमारे १५ किलोमीटर लांबीचा रस्ता गेली अनेक वर्षे दुरावस्थेत होता. ह्या रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण व मजबुतीकरण करावे यासाठी मार्गावरील कालकुंद्री व अन्य गावातील ग्रामस्थ तसेच चंदगड तालुका अन्याय निवारण संघर्ष समिती यांनी अनेक वेळा रस्त्यातील चिखलात भात रोप लावणी, रास्ता रोको, ठिय्या, उपोषण अशी आंदोलने केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी राजगोळी ते दड्डी तर यंदा कागणी ते राजगोळी खुर्द मार्ग डांबरीकरण झाला आहे. या रस्त्यांपैकी कागणी ते कालकुंद्री या दोन किलोमीटर अंतराच्या टप्प्यात मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साठत आहे. यामुळे महत्त्प्रयासाने तयार झालेला रस्ता पुन्हा लवकर खराब होण्याची शक्यता निर्माण झाली असून हे टाळण्यासाठी रस्त्यात पाणी थांबणारी अशी ठिकाणे शोधून साठणाऱ्या पाण्याचा निचरा ठेकेदारामार्फत करण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थ वाहनधारकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment