![]() |
तिलारी घाटात झालेल्या अपघातात चक्काचूर झालेला कंटनेर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड- दोडामार्ग दरम्यान तिलारी घाटात आज दिनांक 28 जून रोजी दुपारी साडेबारा वाजता कंटेनर शंभर फूट खोल दरीत कोसळून अपघातग्रस्त झाला. दरीत कोसळताना दगडांना धडक देत गेल्याने कंटेनर चे अक्षरशः चार तुकडे झाले. यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवून उडी मारल्याने तो बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. तर कंटेनर मधील दुसरा व्यक्ती बाहेर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.
![]() |
अपघातानंतर कंटनरपासून वेगळे झालेले चाक. |
चालक शशी कुमार पी (परमेश्वर आप्पा 40 हाऊस नंबर 171 शिमोगा भद्रावती रोड भद्रावती) व विजय मन गुप्ते 38 (रा. मयुरी टॉकीज रोड चन्नम्मा सर्कल अंकली ता. चिकोडी) अशी जखमींची नावे असून त्यांना चंदगड येथे प्राथमिक उपचार नंतर केएलई रुग्णालयात बेळगाव येथे हलविण्यात आले. शशिकुमार याची प्रकृती चिंताजनक असून विजय मने याचा हात मनगटातून तुटला आहे. हा अपघात घाटातील जयकर पॉईंट येथे कंटेनर चे ब्रेक फेल झाल्याने घडल्याच समजते.
अपघाताची माहिती मिळताच विजघर चेकपोस्ट येथील पोलीस विजय जाधव, किरण आडे यांनी धाव घेऊन दरीत उतरून दोन्ही जखमींना बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात हलवले. दरम्यान घटनास्थळी भेट दिली असता मॅगी पाकीटे, प्लास्टिक रोल घेऊन बेळगाव कडून गोव्यात चाललेल्या या कंटेनरचे चाके, केबिन, इंजिन व हौदा असे चार तुकडे झाल्याचे दिसून आले.
तिलारी घाटातून अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी असतानाही अशी वाहने राजरोस घाटात येऊन अपघात ग्रस्त होत आहेत. पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे. मागील वर्षभर याच जयकर पॉईंट नजीक संरक्षक भिंत खचल्यामुळे पूर्ण वर्षभर सर्व प्रकारची वाहतूक बंद होती.
कंटेनरचे ब्रेक अचानक फेल झाल्याचे समजते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवताना अपघात झाल्याचे कंटेनरमध्ये बसलेल्या जखमीने पोलीसांना सांगितले. या अपघाताची माहिती घाटातून खाली जाणाऱ्या युवकांनी विजघर चेकपोस्ट येथील पोलिसांना माहिती दिली.
No comments:
Post a Comment