कोवाड येथे लवकरच ५० खाटांचे हॉस्पिटल व कुस्ती संकुल उभारणार, शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेणार...! आमदार शिवाजीराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2025

कोवाड येथे लवकरच ५० खाटांचे हॉस्पिटल व कुस्ती संकुल उभारणार, शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेणार...! आमदार शिवाजीराव पाटील

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
    चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोवाड येथे ५० खाटांचे हॉस्पिटल, भव्य कुस्ती संकुल उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. ते कोवाड (ता. चंदगड) येथील येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम कोवाड येथील स्वामीकार रणजीत देसाई सांस्कृतिक भवन तथा श्री मंगल कार्यालय येथे पार पडला.
    कार्यक्रमाची सुरुवात लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमापूजन व शालेय विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. कार्यक्रमाच्या स्वागताचा खर्च टाळून त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीत साठलेला गाळ महापुरास कारणीभूत ठरत असल्याने हा गाळ काढण्याचे नियोजन होते पण सुप्रिम कोर्टाचे आदेश वेळेत न मिळाल्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी गाळ काढता आला नाही. पण पावसाळा संपताच गाळ काढण्यात येईल. तर नदीतील वाळू घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना देण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, रस्ते याबाबत भाजप सरकार संवेदनशील असून चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील गरज ओळखून येथे ५० खाटांचे रुग्णालय येत्या एक-दोन वर्षात सुरू होईल. कुस्ती संकुलासाठी आपण जागेची पाहणी केली असून लवकरच सुसज्ज कुस्ती संकुल उभारले जाईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
  बेळगाव वेंगुर्ले हा राज्यमार्ग चौपदरी करण्यासाठी आपली व कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी बैठक झाली असून हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. गेल्या काही वर्षात विविध अपघातात सुमारे अडीचशे प्रवासी व वाहनधारकांनी या मार्गावर जीव गमावले आहेत. यापुढे असे होऊ नये यासाठी आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, सरपंच अनिता भोगण माजी जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, अशोकराव देसाई आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमापूर्वी आमदार पाटील यांनी कोवाड परिसरातील विविध गावचे ग्रामस्थ व कोवाड येथील व्यापारी यांच्याशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांच्या लाभार्थींना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्टेजवर एम. जे. पाटील, वाय. बी. पाटील, जुबेर काझी, भावकु गुरव, वनक्षेत्रपाल शितल पाटीलआदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी पाटील यांनी केले मंडल अधिकारी शरद मगदूम यांनी आभार मानले.

शासनाचा स्तुत्य उपक्रम
   ग्रामीण भागातील शेतकरी, अशिक्षित नागरिक, विद्यार्थी, अपंग आदींना शासकीय कामासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले सहज मिळावे यासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. यासाठी तहसील कार्यालयाकडून २५ शासकीय व निमशासकीय विभागांना या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची निर्गत करणे, आवश्यक दाखले तात्काळ देणे बाबत सूचना देण्यात आली होती. तथापि कोवाड विभागातील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग व कृषी या विभागशिवाय इतर कोणत्याही विभागाची उपस्थिती दिसून आली नाही. यामुळे या अभियानाचे गांभीर्य शासकीय निमशासकीय कार्यालये कितपत पाळतात? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला. कार्यक्रमाला न आलेल्या तसेच केवळ उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावून पळालेल्या विभागांवर कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
 
शक्तिपीठ मार्ग चंदगड तालुक्यातून?
   भाजप प्रणित महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून विशेषतः कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून विरोध होत आहे. नागपूर पासून गोव्याला जोडणाऱ्या या महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचा समावेश नाही. तथापि हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या तालुक्यातील चंदगड, झांबरे, पारगड या मार्गाने गोव्याला जावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून संभाव्य नकाशा त्यांनी मागून घेतला आहे. असे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून गेल्यास त्याचे निश्चितच स्वागत होईल.

No comments:

Post a Comment