राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३१ हजार रुग्णांनी घेतला मोफत उपचारांचा लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2025

राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३१ हजार रुग्णांनी घेतला मोफत उपचारांचा लाभ

गारगोटी येथे योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे आदी मान्यवर 

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५ उपजिल्हा व ९ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. यात प्रत्येकी १ आयुर्वेद व १ होमिओपॅथी डॉक्टर कार्यरत असून जिल्ह्यातील ५ आयुर्वेदिक डिस्पेंसरी आयुष्मान आरोग्य मंदिर मध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात या १४ रुग्णालयांमध्ये एकूण २ लाख ११ हजार ९८ रुग्णांनी, आयुष्यमान मंदिर अंतर्गत १६२५३ रुग्णांनी तर ३६६८ रुग्णांनी पंचकर्म उपचारांचा मोफत लाभ घेतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रिया देशमुख यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली गारगोटी येथील कार्यक्रमात त्या माहिती देत होत्या. 
   जगात सुख- शांती नांदायची असेल तर भारतीय परंपरेतून आलेल्या योग अभ्यासाचा प्रसार जगभर झाला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनोच्या व्यासपीठावरून याबाबत जगाला केलेल्या आवाहनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळत आहे. निरोगी राहण्यासाठी योग हा सुवर्ण मार्ग आहे त्याचा अवलंब सर्वांनी करून शतायुषी निरोगी जीवन जगावे. असे विचार आरोग्यमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ पल्लवी तारळेकर यांनीही विचार मांडले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी आनंद वर्धन, वैद्यकीय अधिकारी डॉ मिलिंद कदम, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल कुलकर्णी, डॉ सविता शेट्टी यांच्यासह गारगोटीसह जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी तसेच कर्मवीर हिरे महाविद्यालय व शाहू कुमार भवन प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक दत्तात्रय करवळ यांच्या मार्गदर्नाखाली  सर्वांनी योग्य प्रात्यक्षिकात भाग घेतला. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ संदीप पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment