हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले पारगडवर ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशनचे नियोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2025

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले पारगडवर ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशनचे नियोजन

 

6 जून 2025 रोजी चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड वर पार पडलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची क्षणचित्रे

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक  पारगड किल्ल्यावर ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ राज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी उपस्थित शिवभक्तांनी गड दणाणून सोडला होता. 

      कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फौऊडेशन, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मजरे कार्वे, ग्रामस्थ मंडळ पारगड, गडहिंग्लज, आजरा आणि बेळगांव सीमा भागातील शिवभक्तांच्या संयुक्त विद्यमाने पारगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा गेली आठ वर्षे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही हजारो शिवप्रेमी मावळ्यांच्या उपस्थित गेले दोन दिवस हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.  किल्ले रायगडच्या धर्तीवर होणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकच गडद होत असल्याचे उपस्थितांच्या वाढत्या संख्येवरून  अधोरेखित होत आहे.

       गडावर दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी पाच जून रोजी गड स्वच्छता गड पूजन गोंधळ पोवाडे व रात्री सुप्रसिध्द संगीतकार अभिजीत पाटणे व त्यांच्या साथीदारांचा बहारदार गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी भवानी मंदिर ते गडाच्या पायऱ्यांपर्यंत शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पायऱ्या वरील हनुमान मंदिर शेजारील तोफा व भगवा ध्वज स्तंभ येथे भंडारा उधळण करून पुन्हा पालखी भवानी मंदिर पर्यंत आणण्यात आली यावेळी सदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या ठिकाणी वळीवडे कोल्हापूर येथील दिगंबर खांडेकर आखाडा पथकाच्या चित्त थरारक युद्ध कला व लेझीम खेळ प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यानंतर शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा भवानी मंदिर येथे पार पडला.

       तत्पूर्वी दि. ५ रोजी मजरे कार्वे येथून पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुप्रसिध्द हलगी वादक संजय बापू आवळे व त्यांच्या साथीदारांच्या हलगी वादनाने या मिरवणुकीत रंगत भरली होती. विविध वाहनांतून सायंकाळी सर्व शिवभक्त पारगड येथे दाखल झाले. 

            दोन दिवस छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे अभ्यासक व शाहीर पराग निट्टूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम पार पडले. त्यांना प्रियांका निट्टूरकर व इतर यांची साथ मिळाली. रात्री झालेल्या गोंधळ प्रसंगी  संजय बापू आवळे यांच्या हलगी वादनाने गडावर अक्षरशः चैतन्य निर्माण झाले होते. हलगीच्या ठेक्यावर हातात दिवट्या घेऊन नाचवताना तरुणाई बेभान झाली. रात्री उशिरापर्यंत गोंधळाचा कार्यक्रम रंगला होता. 

        आज दि. ६ जून रोजी पहाटे मजरे कार्वे येथील भजनी मंडळाच्या काकड आरती नंतर, ध्वजारोहण, शस्त्रास्र पूजन व भंडारा उधळण करण्यात आली.  माजी आमदार राजेश पाटील, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर,  लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी  कार्वेचे सरपंच शिवाजी तुपारे, देवापा बोकडे, पांडुरंग बेनके, एकनाथ पाटील, रघुवीर शेलार, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रकाश चिरमुरे, रमेश यादव यांच्यासह पारगड ग्रामस्थ, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज येथून आलेल्या शिवभक्तांनी गडहिंग्लज तालुक्यातून शिवराज्याभिषेक कार्यक्रमासाठी जमा झालेली 84 हजार रुपये रोख देणगी शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन कडे सुपूर्द केली. याशिवाय उपस्थित अनेक शिवभक्तांनी या हा कार्यक्रम अधिकारी चांगला व्हावा यासाठी उदारहस्ते देणग्या दिल्या.

No comments:

Post a Comment