पारगड मोर्ले रस्ता कामा वरील ग्रहण सुटणार कधी? ग्रामस्थांचा सवाल, बांधकाम विभागाने तात्काळ काम सुरू करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2025

पारगड मोर्ले रस्ता कामा वरील ग्रहण सुटणार कधी? ग्रामस्थांचा सवाल, बांधकाम विभागाने तात्काळ काम सुरू करण्याची मागणी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

    पारगड (ता. चंदगड) ते मोर्ले (ता. दोडामार्ग) या राजमार्ग १८७ या रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. अशी अनेक वेळा मागणी करूनही काम सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हे काम निवडणूक आचारसंहिता नंतर सुरू करू! अशी आश्वासने पोकळ आश्वासने लोकप्रतिनिधी देत आले आहेत. या आश्वासनांना कंटाळलेल्या ग्रामस्थांनी पारगड मोर्ले रस्ता कामावरील आचारसंहितेचे ग्रहण सुटणार तरी कधी? असा सवाल करत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

       छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला बांधून त्या आधाराने आरमार दल उभे केले. या सिंधुदुर्ग किल्ल्यापासून नजीकचा किल्ला म्हणून घाटमाथ्यावरील पारगड किल्ल्याचे महत्व होते. दोन्ही किल्ल्यावर मराठेशाही च्या काळात सरदार मावळ्यांची मोर्ले -पारगड मार्गानेच ये जा चालायची. मराठेशाहीच्या अस्ता नंतर ब्रिटिशांच्या काळातही या रस्त्यावरून टांगा, जीप यासारखी वाहने दोन्ही किल्ल्यादरम्यान येजा करत असल्याचा इतिहास आहे. तथापि नंतरच्या काळात मार्गावरील वर्दळ कमी झाल्याने रस्त्यात मोठे जंगल तयार झाले. सद्यःस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडण्यासाठी या मार्गाची निर्मिती अत्यंत गरजेची बनली आहे. 

       तिलारी दोडामार्ग घाटाला पर्याय म्हणून हा सोपा मार्ग पूर्ण व्हावा यासाठी गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पारगड, इसापूर व मोर्ले, घोटगेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ धडपड करत आहेत. पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षात या मार्गाच्या पूर्ततेसाठी ३३ वेळा विविध प्रकारची लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, ठिय्या, धरणे, रस्ता रोको, घेराव अशी आंदोलने करण्यात आली.  तरीही रस्त्याच्या कामाची पूर्तता झालेली नाही. 

       ६ वर्षांपूर्वी सावंतवाडी चे आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून सपाटीकरण मार्गावरील ओढ्यांवरील मोऱ्या यांची बांधकामे आदी पाच कोटी पेक्षा अधिक चे काम झाले आहे. तथापि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील काम वेळेत पूर्ण न केल्याने वनविभागाने कामास मनाई दिली परिणामी काम रखडले आहे. यानंतर यावर्षी २०२५ च्या एप्रिल मध्ये सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी मुंबई व नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामास मुदत वाढ मिळवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. मुदतवाढ मिळाल्याने हे काम सुरू होऊन यंदा पूर्ण होईल अशी अपेक्षा असताना पावसाळा संपून महिना उलटला तरी पुढील कामाच्या कोणत्याच हालचाली अद्याप दिसत नसल्यामुळे लोकांचा रोष वाढत चालला आहे. 

   सहा वर्षे रखडलेल्या या कामाला सध्या लोकप्रतिनिधी आचारसंहितेचे तकलादू कारण दाखवून वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहून  सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी परखड मत व्यक्त केले आहे. 

      या रस्त्यावर आत्तापर्यंत पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्ची पडूनही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. पुढील खडीकरण, डांबरीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वीच पूर्ण होणे गरजेचे होते. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी हे काम रखडले आहे. त्यामुळे केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास चंदगड, आजरा, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील व कर्नाटकातील बेळगाव, हुकेरी गोकाक तालुक्यांचे सिंधुदुर्ग किंवा गोवा राज्यांमध्ये येण्या-जाण्याचे अंतर सुमारे २० किलोमीटरने कमी होणार आहे. यात वेळ आणि पैसा वाचेलच पण परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध होतील. 

       या रस्त्यातील जाणाऱ्या वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीचा मोबदला म्हणून बांधकाम विभागाने शाहुवाडी तेवढीच जमीन हस्तांतरित केली आहे व जितकी झाडे जातील तितकी वृक्ष लागवड ही केली आहे. त्यामुळे  पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. त्यामुळे जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व प्रकारचे अडथळे परस्पर समन्वयाने सोडवून रस्ता पूर्ण करावा व पंचक्रोशीतील ३५ ते ४० गावांच्या विकासाला चालना द्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment