कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द, नरगटे लगतच्या कर्नाटक राज्य हद्दीतील दड्डी सह अन्य गावाजवळून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदी चे पाणी अचानक गढूळ बनले आहे. महापुरात पाण्याला जसा रंग असतो त्यापेक्षाही गढूळ पाणी झाले आहे. अक्षरशः पाण्याला चहाचा कलर आल्याचे दिसत आहे. यामुळे या भागातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चार दिवसापूर्वी स्वच्छ व नितळ असलेले पाणी गेल्या चार-पाच दिवसात चिंचणे गावाच्या हद्दीपासून खाली पूर्वेकडे नदीचे पाणी अचानक अत्यंत गढूळ बनले आहे. या परिसरात राजगोळी खुर्द व अन्य गावांना पाणीपुरवठा करणारे जॅकवेल कार्यरत आहेत. नदीतील अत्यंत गढूळ पाणी जॅकवेलमधून थेट घरातील नळांना येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गढूळ पाण्याची माहिती मिळताच राजगोळी खुर्दच्या सरपंच सौ. सुनंदा लक्ष्मण कडोलकर, उपसरपंच अशोक नाईक व सर्व सदस्य शहानिशा करण्यासाठी गेले असता हे पाणी चिंचणे गावाच्या हद्दीतील डोंगर व जंगल परिसरात खाली येऊन नदीमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. महसूल व आरोग्य विभागाने तात्काळ हे गढूळ पाणी कोणत्या कारणाने येऊन नदीमध्ये मिसळत आहे. याची शहानिशा करून याचा तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजगोळी खुर्द व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांत चिंचणे, कामेवाडी, राजगोळी खुर्द, तिरमाळ, यर्तेनहट्टी, चेन्नेहटी परिसर वाळू उत्खनन व पुरवठ्याचा केंद्रबिंदू बनला आहे. डोंगर पोखरून अपरिमित वाळू उत्खनन सुरू आहे. उत्खनन केलेली वाळू धुवून विक्री केली जाते. हे वाळू धुतलेले पाणी ताम्रपर्णी नदी व या परिसरातील ओढ्या नाल्यांमधून वाहत असते. मातीच्या या गाळामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डोंगर जंगल परिसरातील या व्यवसायामुळे तिथे वावरणारे जंगली प्राणी आता नागरी वस्ती व शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये घुसून नासधूस करत आहेत. येथील डोंगर कितपत पोखरले गेले आहेत हे प्रशासनाने ड्रोन कॅमेरा द्वारे तपासावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पाहणी करून महसूल व आरोग्य विभागाने खुलासा करावा अशी मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment