दुंडगे येथे पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, दहा जणांसह पाळीव प्राण्यांनाही चावा, सावधगिरीचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2025

दुंडगे येथे पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, दहा जणांसह पाळीव प्राण्यांनाही चावा, सावधगिरीचा इशारा

कोवाड : सी एल वृत्तसेवा 

    दुंडगे ता. चंदगड येथे आज मंगळवार दि. १८ रोजी दुपारपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने  गावात दहशत माजवली आहे. या कुत्र्याने गावातील १० जणांना चाऊन जखमी केले. तर काही म्हशींवर हल्ला करत त्यांनाही जखमी केले. सध्या गावभर या खतरनाक कुत्र्याची दहशत माजली आहे. अद्याप या कुत्र्याला पकडण्यात यश आले नसल्याने दुंडगे व परिसरातील ग्रामस्थांनी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी दुचाकीस्वारांनी सावधगिरी  बाळगणे गरजेचे बनले आहे.

   कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये विमल संभाजीपाटील, भरमू मारुतीपाटील, नितेश अरविंदकांबळे, संतोष मनोहर, पर्वती ज्योतिबा कोकितकर, सरिता शिवाजी गवेकर, रामू गणपती पाटील, आर्या पांडुरंग पाटील (वय ४ वर्षे) आदींचा समावेश आहे. यातील जास्त प्रमाणात जखमी झालेल्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तांबूस रंगाच्या या कुत्र्यापासून दुंडगे व परिसरातील नागरिक तसेच पशुपालक शेतकरी, गुराखी यांनी सावधानता बाळगावी व स्वतःसह आपल्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण करावे. असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपसरपंच एल. जी. पाटील यांनी केले  आहे. 

 दरम्यान या निमित्ताने कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्रुटींची लक्तरे निघाली आहेत.

    शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम केल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या कमतरता उघड्या पडत आहेत. आज कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तेथे श्वान दंश उपचारातील कमतरता उघडी पडली. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक वर्षापासून सर्पदंशावरील उपचार केले जात नाहीत. सर्पदंश झालेल्या रुग्णास ४० किलोमीटर वरील गडहिंग्लज किंवा २५ किमी. अंतरावरील बेळगावला न्यावे लागते. सर्पदंशापासून दवाखान्यात जाण्यास जवळपास एक तास लागतो या वेळेत सर्पदंश झालेला रुग्ण जिवंत राहील याची शाश्वती नसते. यावेळी रुग्ण नातेवाईकांची मोठी ससेहोलपट होते. शासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याने हजारो रुपये खर्च करून खाजगी रुग्णालयात गोरगरिबांना उपचार घ्यावे लागतात. यात सुधारणा होऊन सर्पदंशावरील तसेच श्वान दंशावरील सक्षम उपचाराची सुविधा तसेच अन्य रोगांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment