२३ वर्षांनी पुन्हा जमला वर्ग, तुडियेच्या रामलिंग विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2025

२३ वर्षांनी पुन्हा जमला वर्ग, तुडियेच्या रामलिंग विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

        तुडिये (ता. चंदगड) येथील श्री रामलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये इ.१० वी सन २००१-०२ च्या माजी विद्यार्थी–विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल २३ वर्षांनी ऐतिहासिक ठरला. जुन्या आठवणींनी भारावलेले चेहरे, गुरुजनांविषयी असीम कृतज्ञता आणि मित्रमैत्रिणींची भेट—अशा भावना ओथंबून वाहणाऱ्या वातावरणात हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

            सकाळी प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर माजी विद्यार्थी–विद्यार्थिनी आपल्या जुन्या वर्गात हजेरी लावण्यासाठी जात असताना क्षणभर तरी आपले शालेय जीवन पुन्हा अनुभवत असल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कार्यक्रमस्थळी जाताना शिक्षकांचे फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी. पाटील होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संजय कोदाळकर (VTU बेळगाव), सुरेखा पाटील (अकाउंटंट, सोसायटी बेळगुंदी), पशराम पाटील (शिक्षक, ढेकोळी) व प्रतीभा पाटील (शिक्षिका, आजरा) यांनी उत्तमरीत्या पार पाडली.

             प्रास्ताविकात प्रदीप झाजारी (शिक्षक, बेनकहन्नळी) यांनी स्नेहमेळाव्याचे औचित्य सांगत सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थी मनोगतातून संदीप पाटील (M.Tech - Mech, Umicore Pune), डॉ. तुषार पाटील (हरिओम क्लिनिक, गणेशपूर, बेळगावी), सदानंद हुलाजी (मरीन इंजिनिअर) व लता सुतार (अंगणवाडी सेविका, तुडिये) यांनी शाळेतील दिवस, शिक्षकांचे संस्कार आणि घडलेला संघर्षमय प्रवास सांगत उपस्थितांना भावूक केले.

          यानंतर शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गर्वाने उल्लेख केला. ए. वाय. पाटील, वी. एल. सुतार, आर. एम. पाटील, दळवी, आर. बी. गावडे, के. बी. नाईक, चौगुले व शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

          कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी सरपंच व माजी विद्यार्थी शिवाजी कांबळे यांनी केले. त्यानंतर मनसोक्त गप्पा, हशा आणि जुन्या आठवणींनी सजला. बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देत, “आपुलकीचा हा सोहळा पुन्हा भेटू…” अशा भावनिक वातावरणात स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

No comments:

Post a Comment