चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हीं फक्त मला निधी सांगायचा, विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी पुरवला जाईल, शिवाजीराव पाटील हा तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा कोरा चेक आहे! असे सांगताना चंदगड मधील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जायचे असेल तर सव्वाशे ते दीडशे किलोमीटर अंतर जावे लागते यामध्ये त्यांना शासकीय कामासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो हे पाहून चंदगड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज चंदगड आजरा व गडहिंग्लज नगरपरिकेली नगरपंचायतीच्या प्रचाराच्या निमित्ताने चंदगड येथे बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील हिंडाल्को मैदानावर आयोजित विराट जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना अनेक मुद्द्यांना हात घातला. महाराष्ट्रातील सुमारे १३ कोटी लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही ४० हजार गाव खेड्यात राहते. तर निम्मी लोकसंख्या ही ४०० शहरांमध्ये वास्तव्य करते. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात राहणाऱ्या लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज सारख्या शहरांपासून मोठ्या शहरापर्यंत राहणाऱ्या लोकांना लोकांच्या सोयी सुविधाकडे शासनाला अधिक लक्ष द्यावे लागते. त्यामुळे यापुढील काळात या तिन्ही शहरांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, ही शहरे विकासाची केंद्रे बनतील. अशी निःसंदिग्ध ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याशिवाय मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून परिसरातील रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाण्याचे नियोजन, कचरा व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
चंदगड मधील ही विराट सभा पाहून चंदगड नगरपंचायत, गडहिंग्लज नगरपरिषद व आजरा नगरपंचायत निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांचीच सत्ता येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भाने काही मुद्दे मांडले.
मुख्यमंत्री व मान्यवरांचे स्वागत आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी स्वागताचे भाषण केले.
या प्रचार सभेसाठी राज्याचे मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडिक, आम. अमल महाडिक, आम. राहुल आवाडे, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, संजयबाबा घाटगे, अमरीश घाटगे, महेश जाधव, अप्पी पाटील, स्वाती कोरी, नाथाजी पाटील यांच्यासह चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व आजीमाजी पदाधिकारी, आजीमाजी सैनिक, सर्व सेलचे प्रमुख, आजीमाजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपर वॉरीअर्स आणि भाजपा कार्यकर्ते या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव पाटील हा तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा कोरा चेक!
शिवाजी पाटील हा तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा एक कोरा बेरर चेक आहे. या पुढील काळात त्यांनी सुचवलेली कुठलेही काम मी केल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार त्यांनी काढले.
शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेणार
चंदगडच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार शिवाजी पाटील यांनी दूरदृष्टीने शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यात जावा यासाठी आंदोलन केले. त्याला येथील जनतेने मोठा पाठिंबा दर्शवला त्यामुळे शक्तिपीठ मार्ग चंदगड तालुक्यातूनच आपण देणार आहोत. असे सांगताना शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून गेल्यास येथे अनेक उद्योग औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून येतील. परिणामी येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच या परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल यामुळे रोज हजारो पर्यटक येथील व त्यातूनही रोजगाराच्या संधी मिळतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला अभूतपूर्व यश मिळाले. लगेच विरोधकांची ओरड सुरू झाली की आता भाजप महायुतीला बहुमत मिळाले आहे. आता लाडकी बहीण योजना बंद करतील. पण तसे काही होणार नाही. लाडकी बहीण योजना यापुढेही निरंतर सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गेल्या दहा वर्षात राज्यातील ५० लाख लाडक्या बहिणी लखपती झाल्या आहेत. येत्या काळात एक कोटी लाडक्या बहिणी लखपती होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.




No comments:
Post a Comment