
तळगुळी ते दिंडलकोप रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी ते राजगोळी रस्त्याला जोडणाऱ्या तळगुळी ते दिंडलकोप या तीन किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. हे खड्डे डांबरी पॅचवर्क करून वाहतुकीसाठी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील हा महत्त्वाचा रस्ता असून तळगुळी, दिंडलकोप मार्गे कर्नाटकातील कुरिहाळ, हंदीगनूर, कंग्राळी ते बेळगाव ला जातो. राजगोळी परिसरातील ग्रामस्थांना बेळगावला येजा करण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर व जवळचा असल्याने या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. गेल्या वीस वर्षापासून सुरू असलेली चंदगड आगाराची कालकुंद्री- बेळगाव- कालकुंद्री ही बस याच मार्गाने येजा करते. या बस व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एसटी च्या दिवसातून सुमारे दहा-बारा फेऱ्या या मार्गावरून होतात.
७-८ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या जागोजागी पडलेले खोल खड्डे व शेतकऱ्यांनी पाईपलाईन साठी खोदलेल्या चरी अपघातांना आमंत्रण देत आहेत. हे खड्डे व रस्त्यातील पाईपलाईन चरी डांबरी पॅचवर्क ने तात्काळ दुरुस्त कराव्यात. अशी मागणी मार्गावरील ग्रामस्थ, वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.
दिंडलकोप गावातील रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा...
कालकुंद्री- बेळगाव एसटी बसची सर्वाधिक गरज दिंडलकोप गावाला आहे. तथापि येथील ग्रामस्थांची एसटी मार्गावर अतिक्रमणे करण्यात चढाओढ लागलेली दिसते. प्रत्येक घरासमोर दगड, विटा, खडी,वाळूचे ढीग, लाकडे, बैलगाड्यांसह इतर वाहने तसेच सांडपाणीही रस्त्यावरच सोडलेले दिसते. याशिवाय अनेक वेळा रस्त्यालगत शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस असे पाळीव प्राणीही बांधलेले असतात. यामुळे इथून बस चालवणे म्हणजे चालकांसमोर दिव्यच ठरत आहे. या कारणांमुळे ही ड्युटी चालक व वाहकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसते.
गावातील एसटी मार्गावर रुंदीकरणासह दुतर्फा गटारे बांधून रस्त्यात होणारी अतिक्रमणे हटविणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन आदी कामे येथील ग्रामपंचायतीने करावी. तसेच संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ सूचना देऊन अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment