शिनोळी बु. येथे शिवशाही संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2026

शिनोळी बु. येथे शिवशाही संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवशाही संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना एस. एस. सी. परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे प्रेरणादायी वाटप करण्यात आले. २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एस. एस. सी. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पॅड (पुट्टा), पेन (लेखनी), पट्टी व पेन्सिल देऊन त्यांच्या उज्ज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

    या उपक्रमात शिवप्रेमी व माजी सरपंच नितीन पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते एन. डी. बोकमूकर यांनी विद्यार्थ्यांना पॅड (पुट्टा) भेट दिले. वर्गशिक्षक रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हाती लेखनी सुपूर्द केली, तर डॉ. बाबू पाटील यांनी पट्टी व पेन्सिल देत परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य प्रदान केले.

    यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना एन. डी. बोकमूरकर व नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “परीक्षा ही केवळ गुणांची नव्हे, तर आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रमांची कसोटी असते. छत्रपतींच्या धैर्य, शिस्त आणि चिकाटीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्धाराने पेपर लिहा आणि शाळेचे नाव उज्ज्वल करा,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला.

    या प्रसंगी परशराम चुडाप्पा पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विनोद परशराम पाटील, माजी उपसरपंच रघुनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

    दरम्यान, शिनोळी बु. येथील शिवशाही युवक संघटना यांच्या वतीने गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिनोळी बु. येथे असलेल्या अश्वारूढ पुतळ्याची विधीवत पूजा करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयघोष, पुष्पहार अर्पण व अभिवादनाच्या मंगल वातावरणात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

    शिवजयंतीचा प्रेरणादायी संदेश आणि परीक्षेच्या उंबरठ्यावर मिळालेले हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वासाचे बळ ठरले असून, त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

No comments:

Post a Comment