विकास कामांचा डोंगर उभारण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या...! कुदनूर येथे आमदार शिवाजीराव यांची मतदारांना हाक - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2026

विकास कामांचा डोंगर उभारण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या...! कुदनूर येथे आमदार शिवाजीराव यांची मतदारांना हाक



कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

  गद्दारी माझ्या रक्तात नाही. भारतीय जनता पक्ष माझी आई आहे. ज्या अण्णांनी मला आमदार करण्यासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचे पाणी केलं, अशा अण्णांना विसरून चालत नाही.  आण्णांच्या आदेशानुसार त्यांचे सर्व कार्यकर्ते वेड्यासारखे राबले म्हणूनच मी आमदार झालो. मला तालुक्यात पक्ष वाढवायचा आहे. म्हणून भरमूआण्णा हाच माझा नेता आहे. गट वाढीसाठी मी प्रयत्न करणार आहे.

    कुदनूर जिल्हा परिषद मतदार संघातून भाजप पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या ज्योतीताई माझ्या बहिण आहेत. आनंद देसाई दादा माझे मोठे भाऊ आहेत. त्यांच्या पत्नी कमल आनंद देसाई या कुदनूर पंचायत समिती मधून भाजपच्या उमेदवार आहेत. भागासह व चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन विकास कामांना गती देण्याची गरज आहे. अशी हाक चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी कुदनूर (ता. चंदगड) येथे काल दि. ४/२/२०२६ रोजी सायंकाळी झालेल्या प्रचार सभेत दिली.

  भाषणात पुढे बोलताना आमदार म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ  माझ्या साठी कोरा चेक आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या ज्योती दीपक पाटील आणि कमल आनंद देसाई या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या. यांच्या माध्यमातून विकासाचा डोंगर उभा करून मला चंदगडचा शाश्वत विकास करायचा आहे. चंदगड विधानसभा विकासाचे स्वप्न मी उराशी  बाळगलो असून येत्या तीन वर्षात मी चंदगडचा चेहरा मोहरा बदलून टाकीन. कुदनूर च्या गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत माझा परिवार आहे. इथे केवळ विकासाला महत्व दिले जाते. असे सांगत आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली. 

  यावेळी चंदगड तालुक्याच्या हरितक्रांतीचे जनक माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, दीपक पाटील, दिग्विजय देसाई, ज्योतीताई पाटील, आनंद देसाई, कमल देसाई, डॉ संदेश जाधव, सतीश  नागरदळेकर, श्रीगेश  बिर्जे, धनंजय खवणेवाडकर, तुकाराम ओऊळकर, बुढेखान जमादार,  रफिक कालकुंद्रीकर,   बाबाजान  कालकुंद्रीकर, ईश्वर गवंडी, बी. जी. जाधव, कुदनूर येथील मतदार, ग्रामस्थ, परिसरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. शेवटी कुदनुरच्या सरपंच सौ संगीता सुरेश घाटगे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment