तालुक्याला पाण्याने समृद्ध करणाऱ्या माजी मंत्री भरमूआण्णांचे ऋण फेडण्याची मतदारांना संधी..? 'मत्स्य शेती' चे स्वप्न आमदार शिवाजीराव पूर्ण करणार..! - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2026

तालुक्याला पाण्याने समृद्ध करणाऱ्या माजी मंत्री भरमूआण्णांचे ऋण फेडण्याची मतदारांना संधी..? 'मत्स्य शेती' चे स्वप्न आमदार शिवाजीराव पूर्ण करणार..!

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   जगभर फिरलेला माणूस जेव्हा चंदगड तालुक्यात येतो किंवा चंदगड तालुक्यातील माणूस जगभर फिरून पुन्हा चंदगड तालुक्यात येतो तेव्हा त्याच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडते ते म्हणजे 'चंदगड तालुक्यासारखा निसर्ग आणि पाण्याची सुबत्ता जगाच्या पाठीवर कोठेही पाहायला मिळाली नाही'. 

    चंदगड तालुका हा पूर्वीपासूनच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. तथापि सन १९९९ पूर्वीचा इतिहास तपासला तर, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर तालुक्यातील ताम्रपर्णी आणि घटप्रभा या दोन जीवन वाहिन्या कोरड्या पडत. ओढे, नाले तर पावसाळा संपताच महिनाभरात अखेरच्या घटका मोजत. परिणामी शिवारात असलेल्या पिकांच्या घशाला पाण्याअभावी कोरड पडायला सुरुवात व्हायची. तालुक्यातील शेकडो गावांतील माय माऊलींची घागरी घेऊन पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू व्हायची. ठराविक गावांमध्ये असलेल्या नळ पाणी योजनांचे पाणी कमी झाल्यामुळे नळांवर पाणी भरण्यासाठी झुंबड उडायची, तिथे वादविवाद व भांडणाचे प्रसंग नित्याचेच होते. गाई म्हशींच्या अंगावर उन्हाळ्यात अंघोळीचे पाणी अभावानेच पडायचे. एकंदरीत चराचर सृष्टी पुढचा पावसाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत बसायची. 

   परिवर्तनाची नांदी- 

  अशा काळात सन १९९५ मधील विधानसभेची निवडणूक लागली. टी. एन. शेषन सारखा आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करणारा करारी निवडणूक आयुक्त देशाला लाभला. निवडणूक आयोगाच्या कडक देखरेखी खाली पार पडलेल्या २८८-चंदगड,आजरा विधानसभा मतदारसंघातून त्या काळात उदयास आलेल्या 'समविचारी आघाडीचे' अपक्ष उमेदवार 'गरिबांचा नेता' म्हणून परिचित असलेले भरमू सुबराव पाटील अर्थात भरमूआण्णा विजयी झाले. राज्यात निवडून आलेल्या ४७ अपक्ष उमेदवारांपैकी एक असलेल्या भरमूआण्णा यांनी त्रिशंकू ठरलेल्या विधानसभेत तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर करणारे भरमूआण्णा हे पहिले अपक्ष आमदार ठरले. या पाठिंबामुळे त्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे लक्ष वेधून घेत त्यांच्या गळ्यातील ताईत बनले.

   ४५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाले. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोल वर चालणाऱ्या शिवसेना-भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी. या निवडणुकीपूर्वी कृष्णा खोरे विकास लवादानुसार महाराष्ट्राने आपल्या वाट्याचे पाणी सन १९९९ पूर्वी अडवणे बंधनकारक होते. या लवादाच्या अटीनुसार पाणी अडवले नाही तर 'अभी नही तो कभी नहीं' अशी स्थिती होती. हे ओळखून बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कृष्णा खोरे विकास योजना राबवण्याचा आदेश दिला. 

  या कामी नेमण्यात आलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सदस्यपदी आमदार भरमूआण्णा पाटील यांची वर्णी लागली. ही घटना चंदगड तालुक्यातील पाण्याची दुर्भिक्ष दूर करून सुबत्ता आणण्यासाठी निर्णायक टर्निंग पॉईंट ठरली. महामंडळाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या कृष्णेच्या उपनद्या तसेच अनेक ओढे व नाल्यांवर सन १९९६ ते १९९९ या पुढील तीनचार वर्षात शेकडो लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले.

    आपल्या आमदारकी व कृष्णा खोरे महामंडळ सदस्य पदाचा पुरेपूर उपयोग करून घेत अल्पशिक्षित असूनही उच्चशिक्षित असलेल्या अभियंत्यांना पटवून देत अण्णांनी चंदगड तालुक्यात तब्बल १८ धरणे मंजूर करून पूर्ण केली. याशिवाय नजीकच्या आजरा व गडहिंग्लज तालुक्यातही त्यांच्या माध्यमातून अनेक धरण प्रकल्प त्या काळात पूर्णत्वास गेल्याने ताम्रपर्णी, घटप्रभा नद्यांसह हिरण्यकेशी अशा तिन्ही नद्या बारमाही दुथडी भरून वाहू लागल्या. परिणामी तिन्ही तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष इतिहास जमा झाले. आमदार अण्णांच्या कामाने प्रभावीत झालेल्या शिवसेनाप्रमुखांनी भरमू अण्णांच्या ध्यानीमनी नसतानाही रोजगार हमी योजना राज्यमंत्री म्हणून प्रमोशन करत चंदगड तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रीपदासह लाल दिव्याची गाडी बहाल केली होती.

   आमदारकीचा उपयोग आपल्याला निवडून दिलेल्या गोरगरिबांसाठी करण्याचे ठरवलेल्या भरमूआण्णा यांनी धरणांच्या उभारणीची सुरुवात तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातून केली. कर्यात भागातील कुदनूर, कालकुंद्री, किटवाड येथे २, दिंडलकोप, तळगुळी-तिरमाळ, निट्टूर, मलतवाडी, लकिकट्टे, सुंडी अशी कोट्यावधी रुपये खर्चाची सात-आठ धरणे निधी कमी पडू न देता दोन वर्षात बांधून पूर्ण केली. उर्वरित धरणे तालुक्याच्या पश्चिम भागात बांधण्यात आली. यामुळे पश्चिम भागातील लोकांची पाणी समस्या सुटली. भूगर्भातील जलपातळी सुधारल्याने विहिरी, बोरवेल पाण्याने समृद्ध झाले. कृष्णा खोरे योजनेमुळे तालुक्यात पाणीच पाणी झाले. 

   पूर्व भागातील ही धरणे होण्याच्या काही वर्षे आधी बांधलेल्या जंगमहट्टी धरणातील पाण्यावर निम्म्या तालुक्याचे जलसिंचन अवलंबून होते. तथापि या धरणातील पाण्याला खूपच मर्यादा होत्या. हे ओळखून अण्णाांनी त्याही धरणाची उंची वाढवली. मात्र कृष्णा खोरे योजनेतून नवी धरणे बांधल्यामुळे पडीक माळरानावरील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली. सध्या चंदगड तालुक्यातील विविध धरणांवर शेकडो जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. धरणांत आलेल्या पाण्यामुळे हजारो मोटर पंप धारकांना रोजगार मिळाला आहे. ही धरणे होण्यापूर्वी चंदगड तालुक्यात एक साखर कारखाना चालण्याची मारामार होती. तिथे सद्यःस्थितीत चार साखर कारखाने चालतील इतका ऊस निर्माण झाला आहे. याचे सर्व श्रेय हे भरमूआण्णा पाटील यांनाच द्यावे लागेल. 

  चंदगड पूर्व भागातील किटवाड, होसूर, तेऊरवाडी, तिरमाळ, चन्नेहट्टी, खन्नेटी, दिंडलकोप, बुक्कीहाळ खुर्द, बुक्कीहाळ बुद्रुक, कल्याणपूर आदी कोरडवाहू गावातील शेतकऱ्यांसाठी ऊस शेती नशिबी नव्हती. पण भरमू अण्णा यांच्या कृपेने या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटले. आज हजारो टन ऊस उत्पादन करून शेतकरी समृद्ध होत आहेत. पाण्याची ही सुबत्ता तालुक्यातील शेतकऱ्यांना पुढील शेकडो वर्षे समृद्ध करत राहणार आहे.

 या पुढील काळात नव्वदी गाठलेले भरमूआण्णा स्वतः निवडणूक लढवणार नाहीत. म्हणूनच हरितक्रांतीचे जनक ठरलेल्या भरमूआण्णा पाटील यांच्या हयातीत त्यांंच्या आपल्यावरील उपकारांची फेड करण्याची शेवटची संधी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने (मतदान शनिवार दि. ०७/०२/२०२६) तालुक्यातील मतदारांना मिळाली आहे.

   भाजप पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या सुनबाई सौ. ज्योती दीपक पाटील या कुदनूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासोबत कुदनूर पंचायत समिती गणातून कमल आनंद देसाई तर तुर्केवाडी पंचायत समिती गणातून कार्वे गावचे माजी सरपंच शिवाजी तुपारे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना मतदान करून भरमूआण्णांचे उपकार कर्यात भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह पाण्याने समृद्ध झालेल्या तालुक्यातील नागरिकांनी फेडले पाहिजे. अशी चर्चा मतदार संघातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेतून सुरू आहे. त्यामुळे भरमूआण्णांच्या पुण्याईवर सुनबाई ज्योती दीपक पाटील या भरघोस मतांनी निवडून येतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातील जाणकार व्यक्त करत आहेत.

    चंदगड मतदार संघात आमदार शिवाजीराव पाटील विकास कामांचा कळस गाठतील! 

  या निवडणुकीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री भरमूआण्णा पाटील म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळात चंदगड तालुक्यात अनेक धरणांबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी चंदगड व आजरा येथे एमआयडीसी मंजूर करून आणली. अनेक गावे वाड्या वस्त्यांवर पहिल्यांदाच खडीकरण व डांबरीकरणासह रस्ते केले. परिणामी गावोगावी एसटी पोहोचून प्रवासाच्या सुविधा झाल्या. कोवाड, चंदगड व नेसरी येथे महाविद्यालये मंजूर केल्यामुळे मतदार संघातील विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना घराजवळच शिकण्याची सोय झाली. अशी शेकडो कामे सांगता येतील. 

   आता या पुढील विकासाची पालखी 'चंदगड' चे सध्याचे धडाडीचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या समर्थ खांद्यावर दिली आहे. माझ्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील गावोगावी शेततळी तयार करून त्यात मत्स्य बीज व मासे उत्पादन करणे हे माझे स्वप्न होते. मात्र ते अधुरे राहिले आहे. ते स्वप्न माझा आमदार शिवाजी नक्कीच पूर्ण करील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत जवळचे स्नेही म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यांच्या माध्यमातून येत्या तीन-चार वर्षात मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा राहील यात शंका नाही. म्हणूनच आमदार शिवाजीराव पाटील व भाजप चे हात बळकट करण्यासाठी कुदनूर मतदारसंघातून ज्योती पाटील, कमल देसाई व शिवाजी तुपारे तसेच तालुक्यातील भाजपच्या सर्वच उमेदवारांना सुज्ञ मतदार बंधू भगिनी भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास भरमूआण्णा यांनी यावेळी व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment