चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य आणि खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी केवळ मिरवणुकांवर मर्यादित न राहता, ग्रंथांच्या आधारे शिवरायांना समजून घेण्याचा एक स्तुत्य उपक्रम चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाने राबवला. महाविद्यालयाच्या इतिहास विभाग आणि ग्रंथालय व माहिती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर 'अभिनव वाचन प्रकल्प' हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून, संपूर्ण महाविद्यालय परिसर शिवचरित्राच्या वाचनाने भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी या उपक्रमामागची महत्त्वाची भूमिका विषद केली. सध्याच्या काळात इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण होत असून, चुकीचे संदर्भ समाजासमोर मांडले जात आहेत. हे वैचारिक प्रदूषण थांबवणे काळाची गरज असून शिवरायांचा खरा इतिहास हा केवळ ग्रंथ, अभ्यास आणि सखोल वाचनातूनच समजू शकतो, असे त्यांनी ठामपणे मांडले. महाराजांच्या विचारांची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मूळ साधनांचा अभ्यास करावा, या उद्देशानेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे स्वागत केले.
या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवाजी महाराजांचे जीवन हे व्यवस्थापन आणि नीतिमत्तेचा वस्तुपाठ आहे, जो केवळ पुस्तकांच्या वाचनातूनच आत्मसात करता येतो. ग्रंथालय व माहिती केंद्र विभागाचे प्रमुख प्रा. रा. सु. गडकरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रा. डॉ. बी. जी. गावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी हातात शिवरायांच्या जीवनावरील विविध ग्रंथ आणि संदर्भ पुस्तके घेऊन तन्मयतेने वाचन करत होते. केवळ घोषणाबाजी न करता शांततेत चाललेला हा वाचन जागर आणि त्यातून ऐतिहासिक संदर्भ शोधणारी तरुणाई, हे एक आगळेवेगळे रूप या निमित्ताने चंदगडकरांना पाहायला मिळाले. या सोहळ्याला डॉ. एम. एम. माने, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. आर. के. सूर्यवंशी, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एस. टी. गावडे, प्रा. एस. एम. पाटील, श्रीनिवास पाटील, वीरधवल मुळीक, एम. एम. पिरजादे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment