सुंडी येथील शेतकरी मेळाव्यात काजू उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2026

सुंडी येथील शेतकरी मेळाव्यात काजू उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    सोन पांढर सुंडी ऍग्रो कंपनी आणि कृषी विभाग, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १८ रोजी सुंडी येथील लक्ष्मी मंदिर सभामंडपात आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळावा अत्यंत उत्साहात व शेतकऱ्यांच्या भरघोस प्रतिसादात पार पडला. काजू उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्रज्ञानाची दिशा देणारा हा मेळावा मार्गदर्शन, चर्चा व प्रत्यक्ष उपयोगी माहितीमुळे विशेष ठरला.

    कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. संजय पाटील यांनी मेळाव्याच्या उद्देशावर प्रकाश टाकत काजू उत्पादनात गुणवत्तेसह प्रमाणवाढ साधण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झी. नि. पाटील होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत काजूच्या रोपांनी करण्यात आल्याने पर्यावरणपूरक संदेशही देण्यात आला.

    कृषी तज्ज्ञ ऋतुराज चव्हाण यांनी काजू पिकाची आधुनिक लागवड पद्धत, योग्य अंतर ठेवून लागवड, खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच काजू बोंड उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचे सखोल व प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. वैज्ञानिक पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    यानंतर किरण कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर काजू उत्पादन टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक व उपयुक्त उत्तरे देत प्रत्यक्ष शेतात अंमलात आणता येतील अशा उपायांची माहिती दिली.

    या मेळाव्यास तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजीत दावणे, गोपाळ गव्हाळे, तेजस वांद्रे, उद्योजक शेखर पाटील, मोहन खनगुतकर, शिवसंग्राम अग्रोचे नारायण पाटील, सोन पांढर कंपनीचे अध्यक्ष तुकाराम कांबळे, सचिव परशराम पाटील तसेच सर्व संचालक, सभासद, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सूत्रसंचालन चित्रांगी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीता कांबळे यांनी मानले. या मार्गदर्शन मेळाव्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळून उत्पादनवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment