चंदगड : प्रतिनिधी
येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि कॉलेज येथे सुरू असलेल्या उन्हाळी संस्कार शिबिरात “टाकाऊपासून टिकाऊ” या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. पर्यावरणप्रेमी अध्यापिका सुजाता कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंना सर्जनशीलतेच्या जोरावर नवजीवन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी प्रास्ताविक करत या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य आर. पी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सृजनशीलता विकसित होते, असे मत व्यक्त केले.
आपल्या मार्गदर्शनात सुजाता कोरवी यांनी वाढत्या प्रदूषणाची समस्या आणि प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. “पर्यावरण टिकवणे ही केवळ जबाबदारी नसून ती प्रत्येकाची जीवनशैली झाली पाहिजे,” असे सांगितले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. प्लास्टिक बॉटल, सुतळी, कप, ग्लास यांसारख्या टाकाऊ वस्तूंपासून विविध शोभिवंत वस्तू, सजावटीच्या वस्तू आणि उपयुक्त साहित्य तयार करण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक वस्तू तयार केल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचारसरणी विकसित झाली असून टाकाऊ वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पर्यावरण संवर्धनाबाबत प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या कार्यशाळेत सुमारे ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. व्ही. जे. डोंगरे यांनी केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरला असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला अधिक बळ मिळणार आहे.

No comments:
Post a Comment