हरियाणातील रोड मराठा बांधवांचे प्रतिनिधी ७ मे रोजी कोल्हापुरात, शाहू स्मारक येथील येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2026

हरियाणातील रोड मराठा बांधवांचे प्रतिनिधी ७ मे रोजी कोल्हापुरात, शाहू स्मारक येथील येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील

कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा

   सुमारे २६५ वर्षांपूर्वी पानिपत (हरियाणा) येथे झालेल्या अहमदशाह अब्दाली विरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी झालेल्या मराठा सैनिकांचे वंशज आज हरियाणा राज्यातील पानिपत च्या परिसरात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. आपल्या कुटुंबकबिल्यासह गेलेले हजारो सैनिक या लढाईत शहीद झाले. त्यांचे सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक वंशज आजही त्या परिसरात वास्तव्य करून आहेत. महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी संवाद साधून बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी हरियाणा मधील या मराठा बांधवांचे प्रतिनिधी गुरुवार दि. ७ मे २०२६ रोजी कोल्हापुरात येणार आहेत.

यावेळी उपस्थित कोल्हापूर शहर व परिसरातील मान्यवर मराठा प्रतिनिधी

  'अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत' ही हरियाणाच्या रोड मराठ्यांची मातृसंस्था आहे. ही संस्था सन २००३ पासून म्हणजे गेली जवळपास २३ वर्षे रोड मराठा बांधवांना त्यांची खरी ओळख देण्यासाठी अग्रेसर आहे. पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी झाली या लढाईतील हजारो शहीद सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ पानिपत व कर्नाल नजीकच्या बसताडा येथे दरवर्षी स्मृतिदिन पाळला जातो. यावेळी महाराष्ट्रासह देशभरातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात. तथापि केवळ अभिवादन कार्यक्रमा पुरते मर्यादित न राहता रोड मराठा बांधवांना महाराष्ट्रातील मराठा संस्कृतीशी पुन्हा एकरूप होऊन रोटी बेटी व्यवहार व  बंधुभाव वाढवण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात संपर्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील कोल्हापूर यांच्या प्रयत्नाने आयोजित हा कार्यक्रम दि. ७ रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.  खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक व रोड मराठ्यांचा इतिहास संशोधनातून जगासमोर आणणारे 'रोड मराठाकार' डॉ वसंतराव मोरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

  या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार पेठ कोल्हापूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली.  मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनी केले. यावेळी राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सौ सुनीता पाटील, चंद्रकांत पाटील, मावळा कोल्हापूरचे उमेश पोवार, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, बहुजन हिंदू महासंघाचे शिवराज सिंह गायकवाड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, छावा संघटनेचे राजू सावंत, कोल्हापूर मर्दानी खेळाचे विनोद साळोखे, वस्ताद बाबाराजे महाडिक, शैलजा भोसले,  विजय पाटील, अनिल घाटगे, सविता पाटील, शबाना पाटणकर, सुधा सरनाईक, शाहीर मिलिंद सावंत, संभाजी ब्रिगेडचे भगवान कोईंगडे, सोमनाथ घोडेराव, फिरोजखान उस्ताद, माजी नगरसेवक अशोक भंडारे, इतिहास संशोधक जे. के. पवार आदींसह कोल्हापुरातील सर्व मराठा बहुजन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  सात रोजी होणाऱ्या कार्यक्रमास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी केले आहे.

No comments:

Post a Comment