चंदगड : प्रतिनिधी
न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथे आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थी तथा रजिस्टर ऑफ कंपनीज अँड जॉईट डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले शामराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत जीवशास्त्र प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी १ लाख २५ हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांनी करून दिला. यावेळी शामराव पाटील व सौ. सुनिता पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. शामराव पाटील म्हणाले, "आपल्यातील क्षमता ओळखा, परिस्थितीची जाणीव ठेवा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. सतत शिकत राहिल्याने प्रगतीची दारे खुली होतात. स्वयंअध्ययनामुळे यशाचा मार्ग अधिक सुकर होतो."
ते न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी असून आज उच्च पदावर कार्यरत आहेत, ही बाब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.
संस्थेचे ऑडिटर प्रा. एन. एस. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,"माजी विद्यार्थ्यांनी मागे वळून पाहणे गरजेचे आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे."
अध्यक्षीय भाषणात प्रा. आर. पी. पाटील म्हणाले, "मळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा करिअरचे वेगळे मार्ग शोधा. आपल्या तालुक्यातील लाल मातीला बुद्धीमत्तेचे लेणं लाभले आहे. म्हणूनच या विद्या संकुलातून शामराव पाटील यांच्यासारखी रत्न घडतात."
कार्यक्रमाला उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार ए. व्ही. सुतार, उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे आदी मान्यवर व प्राध्यापक, शिक्षक, बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना रेळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एम. निळकंठ यांनी मानले.

No comments:
Post a Comment