इतिहासाचा उलगडा करणारी कलाकृती, चिपळूण येथे सादर केलेल्या 'गोवळकोटचा रणसंग्राम' नाटकाला अभूतपूर्व प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2026

इतिहासाचा उलगडा करणारी कलाकृती, चिपळूण येथे सादर केलेल्या 'गोवळकोटचा रणसंग्राम' नाटकाला अभूतपूर्व प्रतिसाद

  


गोवा : सी एल न्यूज प्रतिनिधी

    राधे कृष्ण एन्टरटेन्मेंट संस्था सांकवाळ, गोवा यांनी नुकत्याच चिपळूण महाराष्ट्र येथे सादर केलेल्या अमित दळवी दिग्दर्शित 'गोविंदगड उर्फ गोवळकोटचा रणसंग्राम' या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीला इतिहास प्रेमी प्रेक्षकांचा भूतपूर्व प्रतिसाद लाभला. सुमारे ३०० वर्षांपूर्वी घडलेल्या व विस्मृतीत गेलेल्या घटनेचा इतिहास नाट्य कलाकृतीत सहभागी झालेल्या​ सांकवाळ येथील दोन वर्षांच्या बालकलाकारांपासून ते ७४ वर्षे वयाच्या ५५ गोमंतकीय महिला कलाकारांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर जिवंत केला..! 

     दि. ०५ ऑक्टोबर १७३३ रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने मराठी सैन्याने मोंगल सरदार सिद्धीविरुद्ध गोवळकोटावर दिलेल्या रक्तरंजित पराक्रमी लढ्याचा आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे सरनौबत आनंदराव गोळे व त्यांच्या दहा बंधुनी स्वराज्यासाठी दिलेल्या अजरामर बलिदानाचा इतिहास या नाटकाद्वारे मांडण्यात आला. या नाट्य कलाकृतीने चिपळूण व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीवर खिळवून ठेवले. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा आणि ध्वनी-प्रकाश योजना अमित दळवी यांनी केली होती.  

    या पहिल्या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन ​चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील नाट्यकर्मी घाणेकर सभागृहात संदीप परांजपे (इतिहास संशोधक, चिपळूण), उमेश सपकाळ (नगराध्यक्ष, चिपळूण), ​डॉ. रुपालीताई दांडेकर (उपनगराध्यक्षा), योगेश आम्रे (सरपंच - लाटे गाव, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांचे दूत), ​सौ. कांचनताई कुल (उपाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश महिला युवा मोर्चा), मारुती उर्फ आबा गोळे (संस्थापक, शिव चातुर्य दिन - आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम),  चिपळूण शहरातील नगरसेवक, दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

 यावेळी बोलताना ​उप नगराध्यक्षा डॉ. रुपालीताई दांडेकर म्हणाल्या "आमच्या चिपळूण शहराजवळ एवढे मोठे रणकंदन माजलेले जसेच्या तसे पाहायला मिळेल अशी कल्पना देखील आम्ही केली नव्हती. ५५ महिलांना एकत्र जमवून हे सादरीकरण करणे सोपे नाही." यावेळी बोलताना सर्व मान्यवरांनी नाट्य कलाकृती व कलाकारांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment