शेतकऱ्यांची उन्नती आणि रोजगारनिर्मितीला मिळणार चालना; २३ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, ओलमच्या ३०० केएलपीडी आसवणी प्रकल्पाचे थाटात उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2026

शेतकऱ्यांची उन्नती आणि रोजगारनिर्मितीला मिळणार चालना; २३ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, ओलमच्या ३०० केएलपीडी आसवणी प्रकल्पाचे थाटात उद्घाटन

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा  (संजय पाटील)

      चन्नेहट्टी-राजगोळी (ता. चंदगड) येथील ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज इंडिया प्रा. लि. कंपनीच्या नूतन ३०० केएलपीडी क्षमतेच्या आसवनी प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) थाटात पार पडले. ओलम ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुथू कुमार एन. यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. बिझनेस हेड टी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमामुळे चंदगड तालुक्यातील औद्योगिक विकासासह शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

२३ प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

        ओलमच्या उन्नती ऊस विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत यामध्ये सहभागी होऊन प्रतिहेक्टरी सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या २३ प्रगतशील शेतकऱ्यांची यशोगाथा केन हेड, सुधीर पाटील यांनी मांडली. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते ‘ओलम गौरव शिल्ड’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रुक्मिणी विठ्ठल घुगरे (महागाव, ता. गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक मिळविणारे गोपाळ पिराजी बेळगावकर (बेळगुंदी, ता. जि. बेळगाव) आणि तृतीय क्रमांक मिळविणारे अरुण जोतिबा पवार  (यशवंतनगर - कार्वे, ता. चंदगड) यांचा समावेश होता. या उपक्रमातून ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.



शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रकल्प उपयुक्त

    यावेळी बोलताना ओलम ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुथूकुमार एन. म्हणाले, “या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्नतीला हातभार लागणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आला असून त्याचा लाभ परिसरातील सर्व घटकांतील नागरिकांना होईल.

    कंट्री हेड संजय सचेती यांनी उन्नती ऊस विकास कार्यक्रमाची माहिती दिली. ओलमने यूपीएलसह विविध कंपन्यांना भागीदार करून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    अध्यक्षीय भाषणात बिझनेस हेड टी. कन्नन यांनी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संपूर्ण ऊस आणि मका ओलम कंपनीला पुरवून प्रकल्पाच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिट हेड एस. राधाकृष्णन यांनी केले, तर आभार प्रदर्शन डिस्टिलरी हेड नरेंद्र रावत यांनी केले. या कार्यक्रमाला ओलम कंपनीचे कंट्री हेड संजय सचेती, डेप्युटी कंट्री हेड नितीन गुप्ता, ग्लोबल फायनान्स कंट्रोलर तथा सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट रामरत्नम, सेफ्टी ग्लोबल हेड सुमेरवंत सिंग, अथणी शुगरचे अध्यक्ष योगेश पाटील, अथणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शेरगावकर, गुरुदत्त शुगर कारखान्याचे अध्यक्ष घाटगे, आदित्य चौधरी, सुमित ग्रोवर, नरेंद्र रावत, राजेश, योगेश, सुधीर पाटील, सदाशिव गणी, सचिन पाटील, संतराम गुरव, रवळनाथ देवण यांच्यासह कंपनीचे विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि ऊसतोडणी-वाहतूकदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment