मुरगाव गोवा येथील महिला कवी संमेलनाला कवयित्रींचा अभूतपूर्व प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2026

मुरगाव गोवा येथील महिला कवी संमेलनाला कवयित्रींचा अभूतपूर्व प्रतिसाद

मुरगाव गोवा येथील महिला कवी संमेलनात उपस्थित मान्यवरांसोबत कवयित्री.

पणजी : सी एल वृत्तसेवा 

   अरबी समुद्र किनारपट्टी लाभलेल्या मोरगाव सडा येथील गोव्याच्या भूमीत दत्तात्रय सेवाधाम मंदिर व छत्रपती संभाजी महाराज स्मारक रंगनाथ महिलांचे कवी संमेलन उत्साहात पार पडले. शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता पार पडलेल्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सौ. पूनम वासुदेव रेडकर उपस्थित होत्या. 

   सौ. शिवानी शिवा परब व सौ. निशाल निलेश उस्कैकर यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवरात्रीच्या सहाव्या रंगाशी समरस होत, हिरव्या रंगाच्या पारंपरिक साड्यांमध्ये भगिनींनी उपस्थिती लावली होती.  गोवा दूरचित्रवाणी वाहिनीच्या ज्येष्ठ संपादिका सौ. शलाका कांबळी उपस्थित होत्या.  

आजची पिढी डिजिटल व मोबाईलच्या विळख्यात सापडलेले असतानाही  ६  ते वय वर्षे ६५ पर्यंतच्या गृहिणी, बाल कवी व कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या काव्यप्रतिभेने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या कवयित्रींनी आपल्या कवितांमधून समाजातील विविध पैलूंवर आणि मानवी भावनांच्या संवेदनशील छटांवर प्रकाश टाकला. सध्या गोवा व देशात जाणवणाऱ्या दुष्काळ परिस्थितीचा संदर्भ देत, जलसंरक्षण व पाण्याचा काटकसरीने वापर यावर कवयित्रींनी प्रभावी काव्यरचना सादर केल्या. 

   या प्रसंगी उपस्थित हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकारी व कवी पद्माकर वांजळे यांनी स्वतः लिहिलेल्या काव्यसंग्रह पुस्तिका देऊन मान्यवरांचे स्वागत केले. कवी संमेलनात सौ. पूनम वासुदेव रेडकर, सौ. निशाल निलेश उस्कैकर, सौ. शलाका संजय मेस्त्री, सौ. अपूर्वा अजित पार्सेकर, सौ. तेजश्री प्रकाश पालव, सौ. अनिला नरहरी साळगावकर, सौ. अस्मिता उदय बांदेकर, श्रीमती आनंदी कांबळी, सौ. अनिशा अजित कांबळी, सौ. नेहा मांजरेकर, सौ. नीलम मायेंद्र उस्कैकर, सौ. शिवानी परब, सौ. रेश्मा काशिनाथ केरकर, सौ. सुजाता अशोक चिपकर, सौ. संजना संजय नाईक, सौ. रेखा उदय पालेकर, सौ. गायत्री गुरुनाथ खाजनकर, कु. अलका रामा नाईक, कु. समायरा सुशांत रेडकर आणि कु. अनन्या शेट्ये यांनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी 'शिव चातुर्य दिन, गरुडझेप मोहीम आग्रा' चे गोवा प्रदेशाध्यक्ष राजाराम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाची सांगता पसायदानाने झाली. शिवानी परब यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment