प्रभावी व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर्वांगीण वाचन गरजेचे : प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, माडखोलकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2026

प्रभावी व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर्वांगीण वाचन गरजेचे : प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, माडखोलकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विद्यार्थ्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्व विकासासाठी सकस व सर्वांगीण वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचारांमध्ये स्पष्टता येते आणि संभाषण कौशल्य विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौफेर वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी केले.

    येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. आर. के. तेलगोटे होते.

        प्रा. कुलकर्णी म्हणाले की, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अभ्यास आणि वाचनाच्या बळावर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या जीवनावर विविध उत्तम ग्रंथांचा प्रभाव होता. वाचनामुळे व्यक्तीच्या जाणिवांचा विस्तार होतो, ज्ञान आणि माहितीचा मोठा स्रोत उपलब्ध होतो, तसेच विचारांची स्पष्टता व संभाषणातील तत्परता वाढते. ज्ञानकोशकार केतकर, गुरुदेव रानडे, कृष्णाजी केळुसकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अफाट वाचनाच्या बळावर आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले.

    अध्यक्षीय भाषणात डॉ. आर. के. तेलगोटे यांनी वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा परस्परांशी जवळचा संबंध असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चौफेर वाचन महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, लेखन, वाचन आणि श्रवण या कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

    प्रा. ए. डी. कांबळे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. तसेच महापुरुषांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिलिंद सबनीस लिखित ‘वंदे मातरम् – खंड एक : इतिहास’ या ग्रंथातील मजकुराचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम्’चे गायन करून सांगता करण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक ग्रंथपाल आर. एस. गडकरी यांनी केले. तर युवराज हेरेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. पूजा देशपांडे, एम. एस. दिवटे, एस. डी. गावडे, व्ही. के. गावडे, वीरधवल मुळीक यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment