परंपरेच्या रंगात रंगली शाळा! दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात; धनगरी वेशभूषेने वेधले लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2026

परंपरेच्या रंगात रंगली शाळा! दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात; धनगरी वेशभूषेने वेधले लक्ष

 


चंदगड, दि. १२ ऑक्टोबर : 

    कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य आर. पी. पाटील यांनी कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची, लोकपरंपरांची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होते, असे त्यांनी नमूद केले.

    या उपक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, संत परंपरेतील व्यक्तिमत्त्वे तसेच कोळी बांधव अशा विविध वेशभूषा साकारल्या. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखांमुळे शाळेचा परिसर सांस्कृतिक रंगांनी न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून महाराष्ट्राच्या विविधतेतील एकतेचा आणि परंपरेच्या जतनाचा संदेश दिला.

धनगरी वेशभूषा ठरली खास आकर्षण!

    कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते शाळेचे ग्रंथपाल शरद हदगल यांची धनगरी वेशभूषा! पांढरा पारंपरिक पोशाख, डोक्यावर पांढरे मुंडासे आणि कमरेला लाल पट्टा अशा अस्सल धनगरी वेशभूषेत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि धनगरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या वेशभूषेचे उपस्थितांनी कौतुक केले.

    या कार्यक्रमाला उपप्राचार्य टी. एस. चांदेकर, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. जी. साबळे, शिक्षक जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment