ढोलगरवाडी फाटा ते कोवाड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 26 ला आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

ढोलगरवाडी फाटा ते कोवाड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 26 ला आंदोलन



कोवाड / प्रतिनिधी
ढोलगरवाडी फाटा ते कोवाड या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांच्या तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 26) दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांनी दिली.
कोवाड ते ढोलगरवाडी फाटा हा रस्ता १२.५ किलोमिटर अंतराचा आहे. गेली ३० वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या  प्रतीक्षेत आहे. सध्या रस्त्याच्या कामासाठी २ .५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने ४.६ किलोमिटरचा रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. परंतू उर्वरित रस्त्याचे बांधकाम कधी होणार हे माहिती नाही. रस्त्यावर वाहनांची रहदारी वाढली आहे. अरूंद व उखडलेल्या रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे.   सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण तसेच मजबुतीकरणाच्या महत्त्वाच्या बाबींचा विचार केला केलेला दिसून येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरणाची गरज आहे. परंतु शासनाकडून या रस्त्याचे टप्पे पाडून बांधकाम केले जात असल्याने या मार्गावरील प्रवाशांचे खड्डयांचे भोग चुकलेले नाहीत. या संपूर्ण रस्त्यावर एकाच वेळी डांबर कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  रस्त्यावरील चढ-उतार वाहतकीला अडथळा ठरत आहेत. अतिक्रमणाने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत ठोस निर्णय जोपर्यंत घेत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे, प्रा. पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment