![]() |
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विश्वनाथ पाटील यांच्या घरातील कपाटे फोडून चोरट्यांनी असे कपाटातील साहित्य विस्कटून टाकले आहे. |
कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी व दुंडगे येथे शुक्रवारी रात्री अज्ञात
चोरट्यांनी सात घरांचे कडी कोयंडे तोडून चोरी केली. 12 लोखंडी कपाटे फोडून 2 लाख
70 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख 10 हजार रुपये लंपास केले.
चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केले होते. एकाच रात्री सात घरांतून चोरी झाल्याने
खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी कोवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामे केले.
सात घरांतून झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी कटावणीचा वापर करुन
एकाच पध्दतीने दरवाजांचे कडी कोयंडे तोडून चोरी केली आहे. चोरटे कर्नाटकातून आल्याचा
संशय आहे. दुंडगे येथील श्री लक्ष्मी सेवा संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कार्यालयातील दोन लोखंडी कपाटे फोडली. त्यामध्ये
काही सापडले नसल्याने गोडावूनच्या दरावजाचा कुलूप तोडून कागदपत्रांचे कपाट खोलले.
पण चोरट्यांच्या हाताला काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी गावातील मैनाबाई
गणपती पाटील यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरातील तांब्याचा हंडा व घागर लंपास
केली.
तेऊरवाडी येथे असोक जोतिबा पाटील यांच्या घरातील दोन कपाटे फोडून
कपाटातील साहित्य विस्कटले. डाॅ. राजेंद्र भिमा पाटील यांच्या घरातील तीन व शिवाजी
रामा पाटील यांच्या घरातील दोन लोखंडी कपाटे फोडून कपाटातील साहित्य विस्कटून
टाकले होते. दोघेही बाहेरगावी असल्याने किती चोरी झाली याची माहीती समजू शकली
नाही. महादेव जानकू पाटील यांच्या घरातील एक लोखंडी कपाट फोडून चोरीचा प्रयत्न केला.
पण चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. विश्वनाथ कृष्णा पाटील यांच्या घरातील एक
कपाट फोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे गंठण, अडीच तोळ्याचा हार, दिड तोळ्याचे
कुडे-झुबे व रोख 10 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. चोरीची माहीती समजताच सकाळी
गावकऱ्यांनी ज्याच्या घरी चोरी झाली आहे. त्यांना दुरध्वनीवरुन माहीती दिली. पोलिस
उपनिरिक्षक प्रमोद वाघ तपास करीत आहेत.
पोलिसांच्याच घरी चोरी
विश्वनाथ पाटील व महादेव पाटील हे दोघे पोलिस खात्यात बाहेरगावी
नोकरीला आहेत. त्यांच्या घरातील घरी चोरी झाल्याने पोलिसांच्या घरी चोरी झाल्याची
गावकऱ्यांच्यात चर्चा सुरु होती.
चोरीची एकच पध्दत
सात घरांतून झालेली चोरीची पध्दत एकच आहे. गल्लीतील चिखलातून
उमटलेल्या गाडीच्या चाकांच्या ठश्यावरुन चोरटे तीन दुचाकीवर आल्याचे दिसून येते.
त्यांनी प्रत्येक घराची कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरी केली आहे.
No comments:
Post a Comment