- शेतीसाठी अन्यायकारक वेळापत्रक.
- वेळापत्रकाने शेतकऱ्यांवर धर्मसंकट.
- तरीही वीजपुरवठा सुरळीत नाही.
निवृत्ती हारकारे / कार्वे :- महावितरण कंपनी प्रत्येेक महिन्याला भारनियमनाचे वेळापत्रक बदलत असते. प्रत्येक महिन्यात नव्याने लादलेल्या वेळापत्रकामुळे शेतकरी नेहमीच संभ्रमात असतो. सध्या चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या शेती फिडरवरील अन्यायकारक भारनियमन वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले आहे. इतके अन्यायकारक भारनियमन वेळापत्रक असूनही दिलेल्या वेळेत सुरळीत वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.
दिवसा केवळ दोन ते तीन तासच सुरळीत वीजपुरवठा
महावितरण कंपनी प्रत्येक महिन्याला शेती फिडर वरील विजेचे वेळापत्रक बदलत असते. जानेवारी महिन्यासाठी ही कंपनीने वेळापत्रक जाहीर केले आहे. हे या विभागासाठी अन्यायकारक वेळापत्रक असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. महावितरणने लागू केलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी 6.20 ते दुपारी दुपारी 2:20 पर्यंत आठवड्यातून तीन दिवस दुपारी 8 तास विद्युत पुरवठा व रात्री 8.20 ते सकाळी 6.20 पर्यंत असा10 तास विद्युत पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात सगळीकडेच दुग्ध व्यवसाय जोमाने सुरू आहे. त्यामुळे सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत शेतकरी शेताकडे जाण्याचे शक्य नाही. त्यामुळे जवळपास तीन तासाचा विद्युत पुरवठा वाया जात आहे. पाच तासांमध्ये कमीत कमी पाच ते सहा वेळा महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे एकूण दोन ते तीन तासाचा विद्युत पुरवठा मिळत आहे. सध्या या परिसरात ऊसाची लागण जोरात सुरू आहे. या परिसरात मुसळधार पावसाची पडतो. त्यामुळे येथे आडसाली लागण केली जात नाही. सर्रास शेतकरी यावेळी हंगामी ऊस लागण करीत असतात. मजुरांशिवाय शेती करता येत नाही व मजूर सकाळी सहा वाजता कसे मिळणार असा प्रश्न आहे.
उभ्या उसाचेही नुकसान
सध्या या परिसरात उसाची तोड जोरात सुरू आहे. शिल्लक ऊसाला पाणी देण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. मात्र या अन्यायकारक भारनियमन वेळापत्रकाने ऊसाला पाणी देणे अडचणीचे बनले आहे. त्यामुळे उभा ऊस वाळून जात आहे. उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांचे पुन्हा आर्थिक नुकसान होणार हे निश्चित आहे. पूर्वीच्या नियोजनाने वीज पुरवठा केल्यास या अडचणींवर मात करता येणे शक्य आहे. याबाबतीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास त्याकडे कानाडोळा केला जात आहे.
जंगली जनावरांच्या मुक्त वावराने शेतकरी भयभीत
या परिसरात तडशिनहाळ, कुद्रेमानी,सुपे भागात पंधरा वीस दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. किंबहुना बिबट्याचे वास्तव्य या परिसरात आहे. त्यामुळे या बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्री-अपरात्री शेतात जाण्याचे टाळत आहेत. या बिबट्या बरोबरच गवे, रानडुक्कर, हत्ती अशा अनेक जंगली हिस्त्र प्राण्यांचा वावर या परिसरात वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी जीवावर उदार होण्यासाठी टीचभर पोटासाठी रात्री-अपरात्री पिकांना जगविण्यासाठी पाणी देत आहेत. यापूर्वीही अनेकवेळा या प्राण्यांच्या वावरामुळे या परिसरात महावितरण कंपनीने शेतातील विद्युत पुरवठा दिवसा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र या मागणीला कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
सध्या या परिसरात थंडीने आपली सीमा गाठली आहे. अशा भयंकर थंडीतून पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळेसुद्धा येथील शेतकरी त्रस्त झाला आहे. या अन्यायकारक भारनियमन वेळापत्रकामुळे व दिवसाच्या भारनियमनामुळे शेतकऱ्याला शेती करणे अवघडीचे बनले आहे. महावितरण कंपनीने यावर ताबडतोब तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. हे अन्यायकारक भारनियमन वेळापत्रक बदलावे व शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा दिवसा द्यावा अन्यथा महावितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवृत्ती हारकारे, कारवे प्रतिनिधी |
No comments:
Post a Comment