
ओलम कारखान्यासमोर आंदोलनाला बसलेले माजी खासदार राजू शेट्टी, शेजारी राजेंद्र गड्ड्यानावर, काडसिद्धेश्वर स्वामी
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड)येथील ओलम साखर कारखान्यावर ३६०० प्रति टन दर द्या अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री शशिकांत नाईक, स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानावर, शिवापूर येथील काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कारखाना आवारात आंदोलन स्थळीच रात्री मुक्काम ठोकून सोमवारी ९ वाजता भाकरी बांधून घेऊन आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.
स्वाभिमानी तर्फे रविवार (दि. २३) कारखान्यावर हल्लाबोल आंदोलन चालू केले. त्यानंतर दुपारी १२ पासून आंदोलन सुरू झाले. सायंकाळी दहा वाजेपर्यंत कोणीही अधिकारी चर्चेसाठी आले नाहीत. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटकातील रयत संघटना यांचे कार्यकर्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ५ वा. माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहिले. यानंतर सायंकाळी परिसरात तणावपूर्ण शांतता होती.
चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.
रात्री उशिरापर्यंत कारखाना प्रशासन ओलम कंपनीच्या दिल्लीतील मुख्यालयात संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात येत होती. मात्र रात्री उशिरापर्यंत दराबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
सोमवारी सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
यावेळी स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा दीपक पाटील, चंदगड तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी, माजी अध्यक्ष बाळाराम फडके, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पवार, कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष विक्रम पाटील, पुरंदर पाटील, स्वस्तिक पाटील, हलकर्णी विभाग अध्यक्ष राजू पाटील, गडहिंग्लज शहर अध्यक्ष अशोक पाटील, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बसवराज मुतनाळे, कर्नाटक करायचे राज्य उपाध्यक्ष जीआउल्ला, राज्यसचिव गोपाळ बसनावर, हुकेरी तालुकाध्यक्ष शांतिनाथ मगदूम, बेळगुंदी ता बेळगाव येथील स्वाभिमान बेळगाव ग्रामीण विभागाचे अध्यक्ष परशुराम पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment