ग्रामदैवताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, वास्तुशांती व कळसारोहन सोहळ्यानिमित्त सामाजिक योगदान, मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन
चंदगड : सी एल वृत्तसेवा
ग्रामदैवत श्री रवळनाथ, लिंगदेव, हनुमान, लक्ष्मीदेवी आणि भावेश्वरी मंदिराच्या वास्तुशांती व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तसेच कळसारोहन सोहळ्याच्या निमित्ताने चंदगड तालुक्यातील दाटे गाव आज अक्षरशः प्रकाशमय झाले. या पवित्र उत्सवाला विशेष अर्थ देत विद्युत महामंडळाचे ठेकेदार आणि सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा तेरणीकर यांनी स्वखर्चातून तब्बल अडीच लाख रुपये खर्च करून संपूर्ण गावासाठी एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले.
गावाच्या सर्व रस्त्यांवर, परिसरात आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यामुळे दाटे गाव सोहळ्याच्या निमित्ताने दैदिप्यमान झाले आहे. समाजासाठी केलेल्या या अनोख्या योगदानामुळे मल्लाप्पा तेरणीकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजसेवक उदयकुमार देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर पांडुरंग नाईक यांच्या हस्ते मल्लाप्पा तेरणीकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भुदरगड तालुक्यातील केनवडे गावचे सरपंच समाधान कांबळे, दाटे येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावले, पुंडलिक गावडे, जयवंत तेरणीकर तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ग्रामदैवताच्या उत्सव सोहळ्यात संपूर्ण गावाला उजळवून टाकण्याचा संकल्प पूर्ण करत मल्लाप्पा तेरणीकर यांनी समाजातील आदर्श सामुदायिक भावना जिवंत ठेवली. त्यांच्या या कार्यामुळे दाटे गावात आनंद व उत्साहाची लहर पसरली आहे.

No comments:
Post a Comment