अखेर चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, 31 ऑगस्टला मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2019

अखेर चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, 31 ऑगस्टला मतदान


चंदगड / प्रतिनिधी 
बहुचर्चित असलेल्या चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 31 ऑगस्ट 2019 रोजी निवडणुक होणार आहे. ऐन गणेशोत्सव काळातच निवडणुक जाहीर झाल्याने पावसाळी वातावरणात उमेदवार प्रचाराचा धुरळा उडविणार आहेत. चंदगड नगरपंचायतीची हि पहिलीच निवडणुक असल्याने पहिल्या निवडणुकीतून नगरसेवक होण्याचा मान मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी  होणार आहे. 
चंदगडला नगरपंचायत व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासह ग्रामस्थांनीही मोठे योगदान दिले आहे. बहिष्कार, आंदोलने, उपोषणे यांच्या माध्यमातून चंदगडकरांनी आपली मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली होती. तर विद्यमान सरपंच सुजाता सातवणेकर व इतर सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामेही दिले होते. अखेर ग्रामस्थांच्या एकजुटीसमोर सरकारने नमते घेत चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा २ जानेवारी २०१९ रोजी दिला. नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याअगोदर झालेल्या निवडणुकीत या ग्रामपंचायतीवर माजी मंत्री भरमू पाटील गटाची सत्ता होती. या गटाच्या सुजाता सातवणेकर यांच्याकडे सरपंचपद होते. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस आदी पक्ष कार्यरत आहेत. माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांचा काँग्रेसमध्ये कार्यरत असणारा मोठा गट भाजपमध्ये गेल्याने भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजप विरोधात इतर पक्ष अशीच लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी 17 वार्डामध्ये निवडणुक येणार आहे. यासंदर्भात निवडणुक विभागाने वार्डरचना करुन निवडणुकीसाठी लागणारी मतदार यादी प्रकाशित केली आहे. पहिल्या निवडणुकीचा नगराध्यक्ष होण्यासाठी एकेका वार्डात बहुरंगी लढतीचे चित्र आहे. 
                                              निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे - 
नामनिर्देशनपत्रे 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 4, 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 16 ऑगस्ट 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

                                                प्रभागानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे – 
प्रभाग क्र. १, २, ५, ६, १२, १४ या प्रभागासाठी सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्र. ३, १०, १७ यासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ४, ९, १३, १५, १६ – सर्वसधारण (महिला) व प्रभाग क्र. ८, ११ – नागरीकांचा मागास प्रवर्ग. 


No comments:

Post a Comment