जयप्रकाश विद्यालयाच्या क्रिडा क्षेत्रातील यशाचा आलेख उंचावला, चार खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2019

जयप्रकाश विद्यालयाच्या क्रिडा क्षेत्रातील यशाचा आलेख उंचावला, चार खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय कबडी स्पर्धेसाठी निवड किणी ( ता . चंदगड ) येथील जयप्रकाश विद्यालयाचे विद्यार्थ्यी.
अशोक पाटील :  कोवाड
किणी ( ता . चंदगड ) येथील जयप्रकाश विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह खेळावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धातून विद्यार्थी चमकत आहेत . क्रीडा शिक्षक पांडूरंग मोहनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० व २१ जुलै रोजी गारगोटी येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यालयातील प्रथमेश बाळेकुंद्री , सागर पाटील , साहील दळवी व सौरभ आंबेवाडकर या चार विद्यार्थ्याची राष्ट्रीय कबडी स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील यशाचा आलेख उंचावला आहे .
किणी येथे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे जयप्रकाश विद्यालय आहे . विद्यालयात आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग भरतात . क्रीडा शिक्षक मोहनगेकर यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार आहे . विद्यार्थ्याची बौध्दीक व शारिरीक प्रगती व्हावी . खेळातून आरोग्य संपन्न विद्यार्थी घडावेत , यासाठी क्रीडा शिक्षक मोहनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याना कबड्डी , धावणे , खो - खो , लांब उडी , उंच उडी या खेळाना विशेष प्राधान्य दिले जाते . शिक्षकांनी स्वतःच्या खर्चातून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय केली आहे . त्यामुळे बाहेरगावचेही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत . क्रीडा क्षेत्रावर विशेष लक्ष असल्याने विद्यार्थ्याना सकाळी साडेपाच वाजता मैदानावर खेळाचे धडे दिले जातात . एक तासाचा सराव झाल्यानंतर अभ्यासीका घेतली जाते . सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा मैदानावर विद्यार्थ्याच्याकडून सराव करून घेतला जातो . त्यामुळे जिल्हा , विभागीय , राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा स्पर्धातून विद्यालयाच्या खेळाडूनी मजल मारली आहे . २० जुलै रोजी गारगोटी येथे महाराष्ट्र राज्य स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या १७ व १९ वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यालयातील प्रथमेश बाळेकुंद्री ( होसूर ) , सागर पाटील ( कडलगे ) , साहौल दळवी ( मांडे ) व सौरभ आंबेवाडकर ( कृदनूर ) या खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली . हरिद्वार येथे होणा - या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून हे खेळाडू खेळणार आहेत . याशिवाय २००८ साली यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला होता . सन २०१०साली १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला होता . सध्या प्रो कबड्डी स्पर्धेत खेळत असलेले सिध्दार्थ देसाई व सुरज देसाई यांचाही याच शाळेच्या मैदानावर कबड्डीचा पाया रचला आहे . चंद्रकांत मनवाडकर हा माजी विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळतो आहे . क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशामुळे शाळेची वेगळी ओळख निर्माण होत आहे .

अशोक पाटील, कोवाड प्रतिनिधी
सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेत क्रीडा क्षेत्रासह विविध उपक्रमांचे आयोजन करुन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले जात आहे . यामध्ये शिक्षण संस्थेच्या पदाधिका - यांसह सर्व शिक्षकांचे योगदान आहे. पांडूरंग मोहनगेकर ( क्रीडा शिक्षक) 

No comments:

Post a Comment