मुसळधार पावसामुळे आठ बंधारे व दोन पुल पाण्याखाली, 65 हजारांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2019

मुसळधार पावसामुळे आठ बंधारे व दोन पुल पाण्याखाली, 65 हजारांचे नुकसान

संततधार पावसामुळे हडलगे बंधारा पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प आहे. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. कधी मुसळधार तर कधी उघडीप असे चित्र गेले आठवडाभर होते. काल पासून तालुक्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन प्रमुख नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव, गवसे, कानडी, माणगाव, भोगोली, पिळणी हे बंधारे तर चंदगड-हेरे मार्गावरील पुल व हिंडगाव इब्राहिमपूर मार्गावरील मांगलेवाडी जवळील पुलपाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक अन्यत्र वळविण्यात आली आहे.
ताम्रपर्णी नदीला पूर आल्याने चंदगडचे जॅकवेल अर्धे पाण्यात बुडाले आहे. 
संततधार पडणाऱ्या पावसामुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी 115 मिमी तर आतापर्यंत 1345 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मौजे चंदगड येथील पावलु संतान डिसोझा यांच्या घराची भिंत कोसळून 15000 व मौजे हिंडगाव येथील गोपाळ बाळा नाईक यांच्या घराची भिंत कोसळून 50000 रुपयांचे नुकसान झाले आहे. चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील चंदगड पुलावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक आज सकाळपासून ठप्प झाली आहे.
कोनेवाडी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुक ठप्प आहे. 
तरीही पुराच्या पाण्यातून धोका पत्करत लोक या पाण्यातून ये-जा करत आहेत. विशेषत: खासगी वाहनधारक जीव धोक्यात घालून वाहतुक करत आहेत. एखादी दुर्घटना घडण्याअगोदर या ठिकाणी पोलिसांच्याकडून पाण्यातून वाहतुक करणाऱ्यांना रोखण्याची गरज आहे. गवसे बंधाऱ्यावर पाणी आल्याने गवसे ग्रामस्थांना गवसे-कानुरमार्गे चंदगडला यावे लागत आहे. कानडी बंधाऱ्यामुळेही बिकट अवस्था झाली आहे. माणगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने माणगावची वाहतुक तांबुळवाडीमार्गे वळविण्यात आली आहे. कोनेवाडी व हल्लारवडी बंधार पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतुक पाटणे फाटा मार्गे वळविण्यात आली आहे. चंदगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हल्लारवाडी बंधाराही पाण्याखाली गेला आहे. 
                                                 एसटीचे दिड लाखांचे नुकसान............
चंदगड तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका एसटीलाही बसला आहे. पाण्यामुळे अनेक मार्ग बंद असल्याने एसटीचे दिवसभराचे दोन हजार किलोमीटरचे व अंदाजे दिड लाखांचे नुकसान झाल्याचे चंदगडचे आगारप्रमुख विजय हवालदार यांनी सांगितले.
चौकट - तालुक्यातील मंडलनिहाय पावसाची आकडेवारी कंसात आतापर्यतचा पाऊस - चंदगड -154मिमी (1631), नागणवाडी -141मिमी(1248), माणगाव -73मिमी (569), कोवाड -61मिमी (517), तुर्केवाडी -105मिमी (1304) व हेरे -156मिमी (2259).

                                           जुलैमध्येच वीस दिवसात दुसऱ्यांदा पुरस्थिती.................
यावर्षी पावसाला उशिरा सुरवात झाली असली तरी पावसाच्या दमदार आगमनाने पावसाने सरासरी भरुन काढली. जुलै महिन्यात दहा जुलैनंतर तालुक्यात आजसारखी पुरस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा आज 30 जुलैला पुरस्थिती निर्माण झाली आहे. एकाच महिन्यात वीस दिवसात पुन्हा पुरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी जमिनित मुरल्याने याचा शेतीसाठी फायदा होणार आहे.


No comments:

Post a Comment