
चंदगड : कैलास कॉर्नर येथील शिवरायांच्या पुतळ्यासमोरील वैयक्तिक कार्यालयात स्वीयसहाय्यक रवी माडमगीरी यांच्याकडून समस्यांची नोंद रजिस्टर मध्ये करून घेताना नगराध्यक्ष सुनील काणेकर.
चंदगड - संपत पाटील : सी. एल. वृत्तसेवा दि. ३-१-२०२६
चंदगडच्या नगराध्यक्षपदाची अधिकृतपणे सूत्रे हातात घेण्यासाठी नवनिर्वाचित सुनील काणेकर यांना अजून पंधरा दिवसांचा अवधी असला तरी त्यांनी आतापासूनच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम सुरू केले आहे. याचा प्रत्यय त्यांच्या वैयक्तिक कार्यालयात येत आहे. शहर उपनगरातील नागरिकांच्या समस्यांची खास नोंद करून घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कार्यालयात एक विशेष रजिस्टर घातले आहे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईलला किंवा त्यांच्या कार्यालयातील मोबाईलला संपर्क साधून समस्या मांडल्या तर त्या समस्या स्वतःच्या रजिस्टरमध्ये लिहून घेतल्या जात आहेत. यानंतर संबंधित यंत्रनेला ते मोबाईलद्वारे किंवा टेलिफोनद्वारे किंवा स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या कामांचा तसेच समस्यांचा नीपणारा होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शहर उपनगरात तर १४,००० हून अधिक लोकसंख्या आहे. धर्मवीर संभाजी चौक येथील मुख्य सोलार दिवे खांबावरील काही दिवे बंद आहेत. याबाबतची समस्या कागणी येथील प्रवासी व चंदगड, नवीन वसाहत येथील श्री किड्सचे कापड व्यवसायीक लक्ष्मण परीट यांनी त्यांच्याकडे मांडली असता, त्यांनी त्वरित आपले स्वीय सहाय्यक रवी माडमगीरी यांना सांगून समस्यांच्या रजिस्टर मध्ये नोंद करावयास लावले. यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला कामाला लावले. काही कर्मचारी अचानकपणे रजेवर गेले असतील तर पर्यायी कामांची व्यवस्था त्वरित झाली पाहिजे, असेही त्यांनी नगरपंचायतच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सांगितले. शहर उपनगरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे यांना प्राधान्य द्या, असेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच कर्मचाऱ्यांना सांगितले.
अधिकृतपणे नगराध्यक्षपद व सदस्य मंडळ अस्तित्वात येण्यासाठी अद्याप पंधरा दिवसांचा अवधी लागेल. निवडणुकीआधीही अनेक महिने नगरपंचायत वर प्रशासक होते. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. या कामाला आता नूतन सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यानंतर आता गती मिळेल.

सुनील काणेकर, नगराध्यक्ष (चंदगड नगरपंचायत)
``शहर उपनगरातील अनेक नागरिक आपापल्या समस्या मांडत आहेत काही समस्या सोडवण्यासाठी अवधी लागणार आहे. या सर्व समस्या रजिस्टरमध्ये नोंद करून त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी शहर उपनगरातील समस्यांसाठी थेट मला किंवा कार्यालयात संपर्क साधावा.``
No comments:
Post a Comment