संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त चंदगडमध्ये ‘एक दिवस स्वच्छतेसाठी’ अभियान, नगराध्यक्ष सुनील काणेकर स्वतः झाडू हाती, स्मशानभूमी व नदीकाठ परिसराची स्वच्छता, लोकसहभागातून स्वच्छ चंदगडचा संकल्प - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2026

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त चंदगडमध्ये ‘एक दिवस स्वच्छतेसाठी’ अभियान, नगराध्यक्ष सुनील काणेकर स्वतः झाडू हाती, स्मशानभूमी व नदीकाठ परिसराची स्वच्छता, लोकसहभागातून स्वच्छ चंदगडचा संकल्प



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त “एक दिवस स्वच्छतेसाठी” या प्रेरणादायी संकल्पनेतून चंदगड शहरात भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. नगराध्यक्ष सुनील काणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत ताम्रपर्णी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी व परिसराची संपूर्ण स्वच्छता करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

    या मोहिमेत चंदगड शहराचे नूतन नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी युवकांसह प्रत्यक्ष सहभाग घेत स्मशानभूमीतील कचरा, झाडाझुडपांची साफसफाई व परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा सामाजिक संदेश दिला. महिन्यातील एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी देण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.

    या वेळी बोलताना नगराध्यक्ष सुनील सुभाष काणेकर म्हणाले,“आज आपण सर्वांनी मिळून जे स्वच्छतेचे कार्य केले आहे, त्यातून नागरिक व दुकानदारही रोज आपला परिसर स्वच्छ ठेवतील, अशी अपेक्षा आहे. स्वच्छता ही केवळ मोहिम नसून ती आपली सवय बनली पाहिजे.”

        या स्वच्छता मोहिमेत सचिन सातवणेकर, बाळू डिसोजा, शामराव कुंभार, विवेक सबनीस, नंदू पवार, महेश पाटील, भोंगाळे साहेब, रमेश देसाई, विशाल कामत, विशाल जुवेकर, अमोल नागरे, गोविंद बांदेकर, बाळू लोहार, निखिल चौगुले, अभी पवार, रवी माडमगिरी, संकेत कुंभार, अनिकेत पाटील, सचिन नागरे व मयूर गावडे आदी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

        नगराध्यक्षांनी स्वतः झाडू हातात घेऊन काम केल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड देणारी ही मोहिम चंदगड शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

No comments:

Post a Comment