![]() |
| कूर (गारगोटी) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक त्रैवार्षिक अधिवेशनात आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री ना. आबिटकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी |
गारगोटी : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण आणि अर्थ या चार विभागांचे मंत्रालय स्तरावरील सचिव व सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घडवून त्यातून विविध प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. राज्य पेन्शनर्स असोसिएशन पुणे अंतर्गत कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच शाहू लॉन मंगल कार्यालय कूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आबिटकर बोलत होते.
दि. १ मार्च २०२६ रोजी झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर असोसिएशन पुणेचे विभागीय अध्यक्ष एन. डी. मारणे होते.
![]() |
| अधिवेशनास हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक शिक्षिका |
यावेळी पुढे बोलताना आबिटकर म्हणाले सेवानिवृत्त शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये निवृत्तीवेतन, अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी १५ ऐवजी १२ वर्षे करणे. ६५, ७०, ७५, ८० वर्षे वयानंतर अनुक्रमे ५, १०, १५ व २० टक्के अतिरिक्त निवृत्ती वेतनवाढ मंजूर करणे. मृत्यू आणि सेवा उपदानाची मर्यादा शासनाने २० लाख रुपये केली आहे त्याचा लाभ प्राथमिक शिक्षकांनाही देणे. केंद्र शासनाप्रमाणे दरमहा १००० रुपये वैद्यकीय भत्ता देणे. एमएससीआयटी (संगणक) वसुली कायदा कायमस्वरूपी बंद करून वसूल झालेली रक्कम परत करणे. पेन्शन धारकांच्या पश्चात कुटुंबातील वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन ६० ऐवजी १००% करावी. आदी २१ मागण्या आहेत यातील मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित विभागांच्या मंत्र्यांचे पीए यांच्याशी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यातील बहुतांशी मागण्या मार्गी लावू. असे सांगताना मला आमदार आणि मंत्री करण्यात प्राथमिक शिक्षकांचा मोठा आशिर्वाद आहे. मी आमदार असताना प्राथमिक शिक्षकांच्या एमएस-सीआयटी वसुली थांबवण्यासाठी मी आग्रह धरल्याने वसुली थांबली असून याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी एमएससीआयटी प्रश्न बाबत खंबीर भूमिका घेऊन वसुली थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल ना. अबिटकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सुरुवातीस अरुण पाटील यांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे वाचन केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, रत्नागिरी जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, भुदरगडचे गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, ज्योतीराम पाटील, वसंत जोशीलकर यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व मागण्याची निर्गत लवकरच करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावर बंडोपंत किरूळकर, विजयकुमार पाटील, मोहन भोसले, आनंदराव जाधव, जनार्दन नेऊंगरे, मधुकर येसणे, बाळासाहेब पवार, सुभाष निकम, डी. डी. पाटील, निवृत्ती भाटले, ज. रा. पाटील, शि. ल. होनगेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व सरचिटणीस, पदाधिकारी उपस्थित होते.
या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यस्तरावरील तसेच कोल्हापूर जिल्हा व सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनांचे नेते व हजारोंच्या संख्येने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शिक्षिकांची उपस्थिती होती.



No comments:
Post a Comment