चंदगड /पणजी : सी एल वृत्तसेवा
कुळवाडी भूषण, रयतेचा राजा, स्वराज्य संस्थापक, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९६ वी जयंती गोवा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ६ मार्च २०२६ रोजी कला शक्ती नृत्य संस्था सांकवाळ- कुठ्ठाळी गोवा, अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत तसेच गरुड झेप संस्था पुणे, शाखा गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच या भव्य दिव्य स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन मुरगाव शैक्षणिक संस्थेच्या वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
६ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. ६ वाजता शिव प्रतिमा पूजन, पाळणा गीत, पोवाडे स्फूर्ती गीते नृत्य आदी शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मनोगत व रात्री ८.०० वाजता स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
सौ सुप्रिया सावंत (संस्थापक अध्यक्षा कलाशक्ती नृत्य संस्था) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ सचिन वयगावकर असून यावेळी डॉ चंपा परब, रूपा एस. नायडू, सौ शमी साळकर (नगरसेविका), चंद्रकांत गावस, रमाकांत बोरकर, सुनील गावस (जि प सदस्य), संतोष देसाई, सुधीर डुबल, तुळशीदास फळदेसाई, सौ श्वेता हजारे, मारुती शिरगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन संस्था पदाधिकारी सौ कीर्ती नाईक, कु. सपना सावंत, राजाराम पाटील, सचिन नाईक, सौ विदिशा पेडणेकर, अमित दळवी, ईशा बक्षी आदींनी केले आहे.

No comments:
Post a Comment