चंदगड तालुक्यात पुरस्थिती जैसे थे, सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2019

चंदगड तालुक्यात पुरस्थिती जैसे थे, सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम

किणी येथे  घराच्या कोसळलेल्या भिंतीसह रंजना गणाचारी.
चंदगड /  प्रतिनिधी
शहरासह परिसरात आज दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. दुपारच्या सत्रात सुर्यकिरणांचे दर्शन झाले. कालप्रमाणे आजही तालुक्यातील कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव, गवसे, कानडी, माणगाव, भोगोली, पिळणी हे बंधारे तर चंदगड-हेरे मार्गावरील पुल व हिंडगाव इब्राहिमपूर मार्गावरील मांगलेवाडी जवळील पुलपाण्याखाली आहे. मौजे शेवाळे येथील धोंडिबा पांडुरंग गावडा यांच्या घराची भिंत कोसळून 15000 तर किणी येथील श्रीमती रंजना विठ्ठल गणाचारी या विधवा महीलेच्या राहत्या घराची भिंत काल मंगळवार दि. ३० रोजी रात्री दहा वाजता कोसळून किमान पन्नास हजारांचे नुकसान झाले. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 55.66 मिमी तर तालुक्यात सरासरी 1400.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वांधिक पाऊस हेरे मंडलमध्ये 93 तर सर्वात कमी 11 मिलीमीटर पाऊस झाला. 
                                   अतिवृष्टीमुळे किणी येथे घराची भिंत कोसळली 
किणी ता. चंदगड येथील श्रीमती रंजना विठ्ठल गणाचारी या विधवा महीलेच्या राहत्या घराची भिंत काल मंगळवार दि. ३० रोजी रात्री दहा वाजता कोसळून किमान पन्नास हजारांचे नुकसान झाले. रंजना  यांच्या  घराची एक भिंत गतवर्षीच्या पावसाळ्यात कोसळली होती तर दुसरी भिंत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळली.त्या व त्यांची मुलगी दोघी जेवण करून रात्री घरात झोपल्या होत्या. सुदैवाने भिंत बाहेरच्या बाजूला कोसळली जर भिंत आतील बाजूस कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले असून गतवर्षी घराची एक भिंत कोसळली. तर दुसरी यावर्षी कोसळली त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घटनेचा पंचनामा पोलीस पाटील व तलाठी  यांनी केला असून पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासकीय पातळीवरून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गणाचारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment